राम मंदिर निकाल; उपराजधानीत कडेकोट सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

 नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी तातडीने पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत अधिकाऱ्यांना आवश्‍यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच बैठकीत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातही व्यूहरचना ठरविण्यात आली असल्याची माहिती आहे.

नागपूर : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात शनिवारी निकाल जाहीर करणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर उपराजधानी नागपुरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस विभाग सज्ज झाला आहे. शहरातील अतिसंवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. 

निकालानंतर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, याकरिता पोलिस विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सोमवारी (ता. चार) राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहे. शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. प्रामुख्याने संवेदनशील ठिकाणी पोलिस नियुक्त करण्यात येणार असून, गस्तही वाढविण्यात येणार आहे. 

-मिरवणुकींवर प्रतिबंध 
-जमाव करून थांबू नये. 
-सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील, अशाप्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत. 
-निकालानंतर गुलाल उधळू नये. 
-फटाके फोडू नयेत. 
-सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत. 
-महाआरती अथवा समूह पठणाचे आयोजन करू नये. 
-घोषणाबाजी, जल्लोष करू नये. 
-मिरवणुका, रॅली काढू नये. 
-कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये. 
-कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये. 

उल्लंघन केल्यास कारवाई 
सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्यांच्यावर भारतीय दंडसहिता कलम कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे, ते अपवित्र करणे कलम 295 (अ), कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे, कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police, ram temple issue