पोलिसांचे आरटीपीसी ‘मालामाल’!

अनिल कांबळे
रविवार, 24 जून 2018

नागपूर - शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे काही आरटीपीसी (रेडिओ टेलिफोनिक पोलिस कॉन्स्टेबल) ‘मालामाल’ होत असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. साहेबांचे नाव सांगून आरटीपीसी स्वतःचेच खिशे गरम करीत असल्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांमध्ये साहेबांच्या आरटीपीसींबाबत नाराजीचा सूर असल्याचे जाणवत आहे.

नागपूर - शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे काही आरटीपीसी (रेडिओ टेलिफोनिक पोलिस कॉन्स्टेबल) ‘मालामाल’ होत असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. साहेबांचे नाव सांगून आरटीपीसी स्वतःचेच खिशे गरम करीत असल्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांमध्ये साहेबांच्या आरटीपीसींबाबत नाराजीचा सूर असल्याचे जाणवत आहे.

शहर पोलिस दलात साहेबांच्या मर्जीतील पोलिस कर्मचारी म्हणून ‘आरटीपीसी’ची ओळख आहे. ते साहेबांना मॅसेज देण्यासाठी ‘वॉकीटॉकी’ पकडून असतात. साहेबांकडून सुटी मंजूर करून घेण्यापासून ते कुठे छापा घालायचा आणि कुठे नाही, हे सर्व काही मोजके आरटीपीसींच्या माध्यमातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोचते. त्यामुळे पोलिस विभागात आरटीपीसीला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झाले आहे.

अनेक आरटीपीसी थेट पोलिस उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना ‘आदेश’ दिल्याप्रमाणे तोरा मिरवितात. कुणी अधिकारी ऐकत नसेल तर दमसुद्धा भरतात. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असून, आरटीपीसी काय ‘उद्योगधंदे’ करतात याकडे दुर्लक्ष करतात. काही दिवसांपूर्वीच असेच ‘धंदे’ उघडकीस आल्यामुळे एका आरटीपीसीची बदली केली तर एकाची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सीडीआर काढण्याची गरज
काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे आरटीपीसी थेट धंदेवाल्यांच्या ‘कनेक्‍ट’मध्ये आहे. अवैध धंदेवाल्यांचा किंवा आरटीपीसींच्या मोबाईलचे सीडीआर काढल्यास त्यांचे बुरखे फाटण्याची शक्‍यता आहे. काही आरटीपीसी अवैध धंदेवाल्यांकडून किराणापासून ते नव्या कपड्यांपर्यंत वसुली करीत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली.

साहेब म्हणतात, ‘पाहून घे’!
साहेबांचाच माणूस अवैध धंदेवाल्यांशी मैत्री करीत असेल तर पोलिस ठाण्यातील अधिकारी कारवाई करण्यास घाबरतात. मात्र, आरटीपीसी हे ‘साहेबांनी सांगितले पाहून घे’ अशी सूचना करीत अवैध धंदेवाल्यांना समज देत आहेत. थेट साहेबांशी संबंध आहेत, असा तोरा अवैध धंदेवाले आरटीपीसीच्या भरोशावर मिरवतात, अशी कुजबूज पोलिस दलात आहे.

Web Title: Police RTPC