Video : खाकी वर्दीमध्ये लपलाय गायक, कोणते गाणे म्हणतो तो वाचा...

सूरज पाटील
Sunday, 26 January 2020

योगेश गायकी मूळचे बीड जिल्ह्यातील गोंडगावचे रहिवासी. सद्या जालना जिल्ह्यातील घनसावंगा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या दर्दी आवाजाला नेटकाऱ्यांनी तेवढीच उस्फूर्त दाद दिली आहे. गायकी यांना घरातूनच वारकरी संप्रदायाचा वैचारिक वारसा मिळाला आहे.

यवतमाळ : खाकी वर्दीतील पोलिस म्हटले की भल्या-भल्यांच्या अंगाला कापरे भरतात. भुवया उंचावतात. मात्र, खाकी वर्दी आड एक संवेदनशील माणूस असतो याचा विसर पडतो. जालना जिल्ह्यात पोलिस दलात कार्यरत योगेश गायकी आपल्या दर्दी आवाजातून "देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों अशी साद घालत आहेत. कर्तव्य बजावत असताना बनविलेला व्हिडिओ सद्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निमित्तही तसेच आहे, प्रजासत्ताक दिनाचे... 

'नफ़रत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको 
ज़िद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो 
देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों...'
हे गीत आहे 1982 ला प्रदर्शित झालेल्या देश प्रेमी या चित्रपटातील. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गिताने रसिकांच्या मनावर गारुड केले. या गीतातील शब्द वर्तमानाला लागू पडतात. 

योगेश गायकी मूळचे बीड जिल्ह्यातील गोंडगावचे रहिवासी. सद्या जालना जिल्ह्यातील घनसावंगा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या दर्दी आवाजाला नेटकाऱ्यांनी तेवढीच उस्फूर्त दाद दिली आहे. गायकी यांना घरातूनच वारकरी संप्रदायाचा वैचारिक वारसा मिळाला आहे.

भजन, कीर्तनामुळे अगदी बालपणापासून त्यांना गायनाची आवड. चोवीस तास "ऑन ड्युटी' पोलिस कर्तव्य बजावावे लागत असताना त्यांनी आपल्यातील गायक तसाच जपला. मनावर कामाचा कोणताही ताण येऊ न देता वेळ मिळेल तेव्हा गीत गुणगुणतात. गायकी व त्यांचे मित्र किशोर दिवटे यांनी उसतोड कामगारांच्या व्यथा मांडणारे गीत "चिवटी' या मराठी चित्रपटासाठी संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

रसिकांची दाद आनंद देते 
वेळ मिळेल तेव्हा गीत गुणगुणत असतो. संगीताचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मायबाप रसिकांची मिळणारी दाद असीम आनंद आणि कामाचे समाधान देते. यापेक्षा दुसरा कोणताही पुरस्कार मोठा नाही. हीच माझ्या गायनाला मिळालेली यशाची पावती आहे. 
- योगेश गायकी, 
पोलिस कर्मचारी, घनसावंगा, जि. जालना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police say the song