पोलिसांनी थांबविली तरुणाची मोटारसायकल अन्‌ उघडकीस आला हा प्रकार... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

शनिवारी रात्री कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पुलगमकर व उपरे नेहमीप्रमाणे रात्री गस्तीवर होते. दरम्यान, एका विनानंबरच्या बाईकवर 14 वर्षीय मुलीसोबत एक तरुण स्वार होऊन भरधाव चंद्रपूरकडे जात होता. त्यांच्याकडे बघून पोलिसांना संशय आला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : एका चौदा वर्षीय मुलीसह विनानंबरच्या वाहनाने भरधाव जाणाऱ्या बाईकस्वाराला बघून रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आला. त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता तो बाईकचालक चौदा वर्षीय मुलीला पळवून नेत असल्याने आढळून आले. शनिवारी (ता.29) रात्रीच्या सुमारास हा सारा घटनाक्रम कोठारी ते चंद्रपूर मार्गावर घडला. 

शनिवारी रात्री कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पुलगमकर व उपरे नेहमीप्रमाणे रात्री गस्तीवर होते. दरम्यान, एका विनानंबरच्या बाईकवर 14 वर्षीय मुलीसोबत एक तरुण स्वार होऊन भरधाव चंद्रपूरकडे जात होता. त्यांच्याकडे बघून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांचे वाहन थांबविले व चौकशीसाठी कोठारी पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान हा तरुण मुलचेरा येथील रहिवासी असून सुखदेव बिस्वास असे त्याचे नाव असल्याचे समजले. तो त्या मुलीला पळवून नेत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. या गंभीर प्रकरणी कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांनी मुलचेऱ्याचे ठाणेदार पाठक यांना या घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची तक्रार मुलचेरा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असून आरोपी सुखदेवविरुद्ध गुन्हा नोंदविला असल्याची माहिती ठाणेदार पाठक यांनी ठाणेदार अंबिके यांना दिली. 

विनानंबरच्या बाईकवरून आला संशय

पीडित मुलगी व आरोपी दोघेही कोठारी पोलीस ठाण्यात होते. दरम्यान, आज मुलचेऱ्याचे ठाणेदार पाठक हे आपली चमू व तक्रारकर्त्यासह कोठारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. संबंधित प्रकरण मुलचेऱ्यातील असल्याने कोठारी पोलिसांकडून पीडित मुलगी व आरोपीला पुढील तपासासाठी मुलचेरा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना केवळ विनानंबरच्या बाईकवरून संशय आल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. आपल्या कर्तव्यासोबत संवेदना जोपासणाऱ्या कोठारी पोलिसांनी अनेक वर्ष बेपत्ता असलेल्या अनेकांचा शोध घेत त्यांची कुटुबियांसोबत भेट घडवून आणण्याचे काम केले आहे. याचसोबत अनेक अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून त्यांचे प्राण वाचविण्याचे महान कार्यदेखील ठाणेदार अंबिके यांनी केले. शनिवारी रात्री समोर आलेल्या या घटनाक्रमाने कोठारी पोलीस "अलर्ट' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

अहेरी ते चंद्रपूर हा मार्ग रात्रभर सुरू असतो. त्यामुळे या मार्गावर वाईट वृत्तींना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी आम्ही अलर्ट आहोत. तशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यातूनच मुलीला पळवित असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. 
- संतोष अंबिके, ठाणेदार, पोलीस ठाणे, कोठारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police stopped the boy's motorcycle and this came infront ...