तुलसीने केला गेम?; ड्रग्ज ठाण्यात ठेवणारे पोलिस कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यात डीसीपीने टाकलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज आणि दोन लाख 45 हजारांच्या रक्‍कमेसह अटक केलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली. पोलिस हवलदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. 

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यात डीसीपीने टाकलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज आणि दोन लाख 45 हजारांच्या रक्‍कमेसह अटक केलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली. पोलिस हवलदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी नंदनवन पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी स्कॉड) कार्यरत असून ते 14 ऑक्‍टोबरला दुपारी नंदनवन परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना जमाल शेख हा अंमली पदार्थाचा तस्कर दिसला. त्याला ताब्यात घेऊन या पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे 34 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी पावडर आढळले. यावेळी आरोपी जमाल पळून गेला. तर काही वेळेनंतर जमालचा साथीदार जावेद अली या पोलिसांना रमणा मारोती चौकात भेटला. तेथे त्याने पोलिसांना पैशाची ऑफर देण्यात आली. 3 लाख 20 हजारांमध्ये कारवाई न करण्याचे ठरले. त्यावेही ड्रग्ज परत करावे लागेल, अशी अट ठेवण्यात आली. पोलिसांनी जप्त ड्रग्स परत देण्यास होकार दर्शवला. जावेदने 3 लाख 20 हजार रुपये नंदनवन डीबीला दिले. मात्र, नंदनवन पोलिसांनी ड्रग्ज परत करण्यास नकार देत शहरातील अन्य ड्रग्ज तस्करांना विक्री करण्याचा प्रयत्न केला. तर काही ग्रॅम ड्रग्ज पोलिसांनी एका मीठ व्यापाऱ्याच्या मुलाला विकल्याची चर्चाही आहे. या सर्व प्रकार पोलिस आयुक्‍तांच्या कानावर गेला. त्यांनी उपायुक्‍त निर्मला देवी यांना कारवाईचे आदेश दिले. 21 ऑक्‍टोबरला दुपारी एसीपी विजय धोपावकर यांनी पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि 2 लाख 45 हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या (एनडीपीएस)नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची 23 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळवण्यात आली. दरम्यान, वरिष्ठांनी हा तपास एनडीपीएसकडे सोपविला. मंगळवारी या पाचही आरोपींना निलंबित करण्यात आले. 
तुलसीने केला गेम? 
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसीचे ड्रग्ज तस्कर जमाल व जावेदशी संबंध आहेत. ते दोघेही तुलसीला महिन्याकाठी जवळपास एका लाखाच्या घरात असलेली ठरावीक रक्‍कम देतात. नंदनवन डीबीने ड्रग्ज जप्त केल्यामुळे आरोपींनी तुलसीशी संपर्क साधला. तुलसीने "निनावी फोन' आणि अन्य सूत्रांमार्फत वरिष्ठांच्या कानापर्यंत माहिती पोहोचून कारवाईत मलाई खाणाऱ्या पाचही पोलिस कर्मचाऱ्यांचा "गेम' केल्याची चर्चा पोलिस दलात दबक्‍या आवाजात आहे. 
पोलिस विभागाची प्रतिमा मलिन 
एनडीपीएस ऍक्‍टअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोपी पाचही पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ होण्याची शक्‍यता आहे. तशाप्रकारच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. या घटनेमुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. या घटनेवरून अनेकांनी धडा घेण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police suspended, drugs