जगी ज्यास कोणी नाही...निराधार आजोबांना ग्रामीण रुग्णालयाने दिला आधार

aajoba
aajoba

पवनी (जि. भंडारा) : म्हातारपण हे दुसरे बालपण असते असे म्हणतात. आयुष्याच्या या संध्याछायेला आपली काळजी घेणारे, हवे नको ते बघणारे, जपणारी माणसे जवळ हवी असतात. परंतु, हे सुख काही सर्वांच्याच वाट्याला येत नाही. पवनीतल्या एका आजोबांच्या वाट्यालाही आयुष्याच्या संध्याकाळी असेच एकाकीपण आले आहे.

आजारपणामुळे नोकरी गमावली. पत्नीनेही साथ सोडली अशा परिस्थितीत फरपट सोसून लाचार होण्याची वेळ आलेल्या एका 81 वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आधार दिला. "निराधार आभाळाचा तोच भार साहे' या ओवींचा दाखला या वृद्धासाठी ईश्वराचे देवदूत बनून आलेल्या कोरोना योद्धयांनी दिला आहे.

मोतीराम मुरारी रामटेके हे तालुक्‍यातील अड्याळ येथील मूळ रहिवासी. आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग बघणाऱ्या मोतीराम यांनी हलाखीच्या परिस्थितीत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या 18 व्या वर्षी 1958 मध्ये त्यांची पोलिसांत निवड झाली. प्रशिक्षणानंतर ते भिसी(जि.चंद्रपूर) येथे रुजू झाले. पुढे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे बदली झाली. वाकेश्‍वर येथील मुलीशी ते विवाहबद्ध झाले. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

सिरोंचा येथे नोकरीदरम्यान त्यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे नोकरी करणेसुद्धा शक्‍य नव्हते. अखेर 1966 मध्ये त्यांना नोकरीतून काढण्यात आले. याचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. पत्नीनेही अर्ध्यावर डाव मोडत माहेर गाठले. नोकरी गेली, पत्नी गेली व कुटुंबीयसुद्धा दुरावले. याच मनस्थितीत त्यांना अध्यात्माचे वेध लागले. देवाची गाणी गात त्यांनी देवदर्शनाला प्रारंभ केला. तरुण वयातच गायमुख, चांदपूर, साखळी, अमरावती, मोर्शी, गिरड, रामदेगी येथील मंदिरात राहून सेवा केली. धार्मिक स्थळी मिळणारे भोजन आणि दानातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता.
देवदुतांनी स्वीकारले

मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन झाला. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद झाली. तुमसर तालुक्‍यातील चांदपूरच्या हनुमान मंदिरात वास्तव्यास असलेल्या मोतीराम यांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले. गावागावांत भिक्षा मागण्याची वेळ आली. परंतु कोरोनाच्या धास्तीने तीही कुणी देत नव्हते. पोलिसांनी त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनी त्यांना अड्याळ येथे पाठविण्यात आले. मात्र, अड्याळ पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात नेले. कुटुंबीयांना सूचना केली. परंतु कुटुंबातील कुणी फिरकलेसुद्धा नाही.

ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला पाठविले. परंतु, रेड झोनमधून असल्याने त्यांना ठेवायचे कसे हा प्रश्‍न होता. परंतु लॉकडाउनमध्ये जाणार कुठे, असाही प्रश्‍न होता. माणुसकीच्या भावनेने शाहीद अली यांनी वैद्यकीय अधीक्षक गुरुचरण नंदागवळी, डॉ. धनंजय गभने व डॉ. संगीता देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात ठेवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरवले.

सध्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. येथे खऱ्या अर्थाने रक्‍त्याच्या नात्याची नसलेली माणसे त्यांची काळजी घेत आहेत. कक्षसेवक माधुरी वाघमारे त्यांची निस्वार्थ सेवा करीत आहेत. आजोबांच्या प्रेमळ व मृदू स्वभावामुळे त्यांची कर्मचारी व डॉक्‍टरांशी चांगली गट्टी जमली आहे. यापूर्वीसुद्धा दुर्गा नामक परिचारिकने एका मनोरुग्ण महिलेची सेवा, सुश्रुषा व सेवा केली होती. स्वार्थी जगातही माणुसकीचा ओलावा अजूनही जिवंत असल्याचा परिचय या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

माणुसकीचे जपले नाते
रक्तांच्या लोकांनी हलाखीच्या दिवसात, संकटाच्या काळात साथ सोडली. मी हयात आहे की, नाही याची दखलही त्यांना घ्यावीशी वाटली नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत मला ग्रामीण रुग्णालयातील लोकांनी जवळ केले. आपुलकी व प्रेम दिले, माझी काळजी घेऊन माणुसकीचे नाते जपले आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी येथे उर्वरित आयुष्य काढणार आहे. याकाळात मिळालेला जिव्हाळा मी कधीच विसरु शकणार नाही.
मोतीराम रामटेके

सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही

माणुसकीच्या भावनेतून मदत
तपासणीसाठी गेलो असता आजारी आणि वयोवृद्ध यांना का ठेवण्यात आले, याची माहिती मिळाली. माणुसकीच्या व मदतीच्या भावनेतून सध्या त्यांची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात केली आहे. त्यांच्यावर योग्य औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृतीही सुधारत आहे.
डॉ. गुरुचण नंदागवळी.
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पवनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com