वीजतारांची चोरी करणारी टोळी जेरबंद; दहा जणांना घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

हरांबा सबस्टेशनचे नवीन वायरिंगचे काम सुरू आहे. मात्र, या कामातील वीजतारा मागील काही दिवसांपासून चोरीला जात असल्याचे प्रकार घडत होते. तब्बल चार किलोमीटर अंतरावरील नवीन वीजतारा चोरीला गेल्यानंतर अमोल गजानन नाडेमवार, लव शंकरराव गौरकार यांनी सावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील हरांबा सबस्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या नवीन वायरिंगच्या कामातील वीजतारा चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी (ता. 30) सहा चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहा झाली आहे. चोरट्यांकडून 8 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

हरांबा सबस्टेशनचे नवीन वायरिंगचे काम सुरू आहे. मात्र, या कामातील वीजतारा मागील काही दिवसांपासून चोरीला जात असल्याचे प्रकार घडत होते. तब्बल चार किलोमीटर अंतरावरील नवीन वीजतारा चोरीला गेल्यानंतर अमोल गजानन नाडेमवार, लव शंकरराव गौरकार यांनी सावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू करीत चार चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीची इलेक्‍ट्रिक कंडक्‍टर तार जप्त केली होती. शुक्रवारी याच गुन्ह्यातील अन्य सहा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून वापरातील वाहने, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. 

अवश्य वाचा- चुलत काका-काकूने अल्पवयीन मुलीला नोकरीच्या नावाखाली केले वेश्या व्यवसायास प्रवृत्त

नागेश राजू रंगारेड्डी (रा. रय्यतवारी कॉलरी चंद्रपूर), योगीदास नामदेव सोयाम (रा. वलनी), आकाश गोकुलदास सेडमाके (रा. नवरगाव), प्रमोद देवराव सोयाम (रा. वलनी), अब्दुल हमीद कांवीर शेख (रा. अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर), रवींद्र संपत गेडाम (रा. वलनी), पवन गजानन घोडाम (रा. वलनी), रनदीप शिवराम आत्राम (रा. वलनी), प्रदीप रामू पेंदाम (रा. वलनी), अनिल दामोधर तोडासे (रा. वलनी) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. सर्व चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिस निरीक्षक राठोड यांचा सन्मान 

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, सहायक पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात सावलीचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, लक्ष्मण मडावी, धर्मेंद्र मून, नारायण सिडाम, दर्शन लाटकर, सुमीत मेश्राम, दीपक डोंगरे यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल तारे यांनी पोलिस निरीक्षक राठोड यांचे कौतुक करीत सन्मान केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power line Wire theft gang arrested; Ten people were taken into custody