esakal | वीज जाताच भामरागडात होते पेट्रोल, डिझेलचे वांधे
sakal

बोलून बातमी शोधा

भामरागड : येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना नागरिक.

भामरागड तालुक्‍यातील नागरिकांना एकाच पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी यावे लागते. परंतु वीज गेल्यावर पेट्रोल, डिझेल मिळत नाही. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना अनेक तास येथे रांग लावून वाट बघावी लागते.

वीज जाताच भामरागडात होते पेट्रोल, डिझेलचे वांधे

sakal_logo
By
अविनाश नारनवरे

भामरागड (जि. गडचिरोली) : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्‍यात संपूर्ण तालुक्‍यासाठी केवळ एकच पेट्रोलपंप आहे. येथेही जनरेटरची सुविधा नसल्याने वीजपुरवठा खंडित होताच पेट्रोल, डिझेलचा पंपही बंद पडतो. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तालुक्‍यातील नागरिकांना याच पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी यावे लागते. परंतु वीज गेल्यावर पेट्रोल, डिझेल मिळत नाही. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना अनेक तास येथे रांग लावून वाट बघावी लागते. पेट्रोलपंपावर जनरेटरची आवश्‍यकता असतानासुद्धा पंपमालक याकडे कानाडोळा करीत आहे.

अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला वीज गेल्यास जनरेटरअभावी वाट पाहावी लागते. अशीच गर्दी वाढली तर तालुक्‍यात कोरोना वाढण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जनरेटर लावण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

तपासणी पथकच नाही

आदिवासी भागात तपासणी पथक येत नसल्याने पेट्रोलपंपावर पेट्रोल देताना ग्राहकांनी, लॉक करून दे म्हटल्यास लॉक करता येत नाही, असे सांगितले जाते. परंतु तालुक्‍यात एकच पेट्रोलपंप असल्याने लोकांचाही नाइलाज आहे. येथे सगळा अनागोंदी कारभार असतानाही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने पेट्रोलपंपमालक निर्ढावला आहे. त्यामुळे येथील समस्येची दखल संबंधित विभागाने घ्यावी व येथील समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा :  डास खूप त्रास देताहेत, घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा

अवैध विक्री सुरूच

तालुक्‍यात एकच पेट्रोलपंप असल्याने अनेक छोटे, मोठे दुकानदार आपल्या घरात बाटलीत पेट्रोल भरून ठेवतात व त्याची अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करतात. मागील अनेक वर्षांपासून पेट्रोल व डिझेलची अशी अवैध विक्री राजरोसपणे सुरू आहे. याच पेट्रोलपंपातून अधिकचे पैसे देऊन पेट्रोल, डिझेल खरेदी केले जाते व चढ्या दराने विकले जात आहे.


(संपादन : दुलिराम रहंगडाले)