
नागपूर : शरद पवार फार जुने सहकारी आहेत. ते देशाचे सुपरिचित नेते आहेत. प्रशासनावर पकड असलेले पवार हे केवळ राजकारणी नव्हे तर ते मुत्सद्दी नेते आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बुधवारी काढले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत केलेल्या कार्याचा पट उलगडला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, देवीसिंह शेखावत, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अनिल देशमुख, रमेश बंग, डॉ. गिरीश गांधी, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
ठळक बातमी - बस अपघातात एक ठार; 41 जखमी
लेकीचा गौरव ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्यावरून स्पष्ट झाल्याचे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांनाही तेच बाळकडू मिळाले असून व्यस्ततेतून त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सांभाळलीच नाही तर काळानुरूप बदल करीत पक्षाला यश मिळवून दिल्याचे त्या म्हणाल्या.
50 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकांचे प्रेम, मार्गदर्शन मिळाले. विरोधी पक्षनेता असताना शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर खूप हल्ला करीत होते. परंतु, संबंधात कधीही कटुता आली नसल्याचे त्या म्हणाल्या. राज्यसभेचे सभागृह चालविण्याची तर लोकसभेत असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात सार्क परिषदेत जाण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाना पटोले यांचेही भाषण झाले. तसेच शरद पवार यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनिल देशमुख यांनी केले. संचालन मधुकर भावे यांनी तर डॉ. गिरीश गांधी यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्या म्हणून प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या स्वभावाविरुद्ध जाऊन आक्रमकतेने टीका केली. मुख्यमंत्र्यांची कोंडी करीत होत्या. परंतु, नंतर आम्ही एकत्रितपणे कामे केली, असे नमूद करीत शरद पवार यांनी राजकारणातील मैत्रीचे किस्से सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे समर्थनासाठी गेलो असता त्यांनी थेट चर्चा कसली, महाराष्ट्राची कन्या असून समर्थन देणार, असे सांगितले. आज त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सत्काराला उपस्थित आहे, हा चांगला योग आहे, असेही पवार म्हणाले.
प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदासाठी दोनदा बाळासाहेबांनी शरद पवारांचे ऐकले. तर मी काय आहे आता सर्वांना कळले असेल की, मी शरद पवारांचे का ऐकले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळासाहेब व पवार यांच्यात मतभिन्नता होती. परंतु, मैत्री तुटली नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, आज काहीजण छत्रपतींचे नाव घेतात अन् आपल्याच लोकांवर तलवारी चालवातात, ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे नमूद करीत त्यांनी भाजपलाही चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.