जनताच सरकारची धुंदी उतरवते - प्रेमानंद गज्वी

Premanand-Gajvi
Premanand-Gajvi

कै. राम गणेश गडकरी नाट्यनगरी, (नागपूर) - सर्वसामान्य माणसाचा विचार सरकार करणार नसेल, तर अशा सरकारची धुंदी जनताच उतरवते, असे स्पष्ट मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात व्यक्त केले.

रेशीमबाग मैदानावरील पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर हा सोहळा पार पडला. झाडीपट्टीतील आदिवासी आणि पालावर राहणाऱ्यांच्या व्यथा मांडताना ते म्हणाले, की झाडीपट्टी व इतर लोककलांसाठी काहीतरी करण्याचे माझे नियोजन आहे. ते नाट्य परिषदेच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू; पण झाडीपट्टीसारखी समृद्ध रंगभूमी ज्या भागात आहेत, त्या भागातील लोकांच्या जमिनी पुनर्वसनात गेल्या. जंगलाच्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याचा विचार सरकारने का केला नाही, सरकार कोणतेही असो, ते सामान्यांचा विचार करीत नसेल तर जनताच धुंदी उतरवते. 

सहिष्णुतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरही गज्वी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘राजकीय लोकांना मी शत्रू मानत नाही. दोन दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादाचा छोटा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून सहिष्णुतेची चर्चा सुरू झाली. देशात सहिष्णुता आहे, असे आपले म्हणणे असेल तर ती व्यवहारात उतरावी, एवढेच माझे आवाहन आहे.’’

सूत्रसंचालन अविनाश नारकर व ऐश्‍वर्या नारकर यांनी केले.

गिरीश गांधींनी टोचले कान
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने नियमावली लवचिक ठेवावी. कारण ज्या शहरात संमेलन होत असते, तेथील संस्कृती, गरजा, भावना वेगळ्या असतात. फार ताणून धरण्याची गरज नसते. स्थानिक आयोजकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. नागपुरात २००७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करताना महामंडळाने आमच्यावर काहीही लादले नव्हते, या शब्दांत संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी मध्यवर्ती शाखेचे कान टोचले.

ठराव न मांडण्याची परंपरा कायम
मुलुंड येथील ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनापासून सुरू झालेली ठराव न मांडण्याची परंपरा नागपुरातही कायम राहिली. ठराव मांडून त्याचे काहीच होत नाही, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी यंदाही हात वर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com