नगरपंचायत निवडणुकीत स्वबळाची चाचपणी, भाजप अन् महाविकास आघाडीची कसोटी

preparation for nagar panchayat election in yavatmal
preparation for nagar panchayat election in yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नगरपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तयारीत आहेत. 

सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना रंगण्याची शक्‍यता होती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याने निवडणुकीपुर्वीच रंगत वाढली आहे. जिल्ह्यातील महागाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव, राळेगाव तसेच कळंब या सहा नगरपंचायतीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2020 ला संपुष्टात आला. तेव्हापासून याठिकाणी प्रशासक कारभार सांभाळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्‍यता आहे. सहा नगरपंचायतीच्या क्षेत्रात भाजपचे पाच आमदार विजयी झाले आहेत. भाजप आमदारांच्या मतदारसंघातील या नगरपंचायती आहेत. त्यामुळे याठिकाणी 'स्कोर'करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

राज्यात काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत तिन्ही पक्षांनी निवडणुका लढविल्या. यात मोठे यश महाविकास आघाडीच्या पदरात पडले. या निवडणुकातही महाविकास आघाडी असेल अशी चर्चा आहे. मात्र, आघाडी केल्यास पदाधिकाऱ्यांना उमदेवारी न मिळाल्यास नाराजी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाची मागणी नेत्याकडे केली आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी पाहता स्थानिक नेत्यांनी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. स्वतंत्र लढल्यास किती जागा येतील, मेरीट असणारे उमेदवार किती अशी चाचपणी सुरू केली आहे. असे असले तरी विजयांचे स्वप्न रंगविताना अंतर्गत बंडाळी, गटबाजीचा फटका सर्वच पक्षांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही गटबाजी मोडीत काढण्याचे आव्हानही नेत्यांसमोर असणार आहे. सर्वच पक्षात नेत्यांचे वेगवेगळ गट आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने हे गट पुन्हा अधिक आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. एका गटाचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी दुसरा गट सक्रीय होत आहे. या पाडापाडीच्या राजकारणात राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नेते ही निवडणूक कक्षा पद्धतीने हाताळतात यावर विजयांचे गणित अवलबूंन आहे.

भाजपची प्रतिष्ठेची लढाई -
निवडणूक होणाऱ्या नगरपंचायत क्षेत्रात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. नगरपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक विजयी करुन विधानसभा निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न आमदारांकडून होत आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. निवडणूक निरीक्षकांच्या माध्यमातून सर्व स्तरावर उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार केले जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com