हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

अधिवेशनासाठी होत असलेल्या तयारीत सर्व घटक विभागांनी सुसूत्रता ठेवावी. या तयारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. विविध सुविधासाठी कार्यवाही करताना जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी जबाबदारीने कामे करावीत. यासोबतच विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरू होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतला.

अध्यक्ष व उपसभापती यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा बैठकीला विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख, विधिमंडळाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी महेश चिमटे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशनासाठी होत असलेल्या तयारीत सर्व घटक विभागांनी सुसूत्रता ठेवावी. या तयारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. विविध सुविधासाठी कार्यवाही करताना जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी जबाबदारीने कामे करावीत. यासोबतच विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विधानमंडळ परिसर, आमदार निवास, रविभवन तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणीपुरवठ्याच्या आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

उर्वरित कामे दोन दिवसांत
महिलांसाठी फिरती शौचालये, आहारविषयक सुविधांबाबत अधिक चांगली व्यवस्था करण्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता सरदेशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्‍यक सर्व सुविधा पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्यात आल्याचे यावेळी सांगितले. सर्व कामे पूर्ण झाली असून छोट्या स्वरूपाची उर्वरित कामे दोन दिवसांत पूर्ण होतील, असे स्पष्ट केले.

मुख्य बातमी -"त्या' मृत बालिकेची डी.एन.ए. तपासणी करा : नीलम गोऱ्हे

कॅंटिनमधील भोजनाची तपासणी करा
आमदार निवास येथील कॅंटिनमध्ये भोजन योग्यप्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील भोजनाची एफडीएकडून तपासणी करण्याच्या सूचना गोऱ्हे यांनी केल्या. अधिवेशन काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून किरायात वाढ करून एकप्रकारे लूट करण्यात येते. यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of winter session in final stage