esakal | अकोला-खंडवा रेल्वे मार्गात वाघ्र प्रकल्पाची अडचण

बोलून बातमी शोधा

wan road

केंद्रीय पर्यावरण समितीकडून मेळघाटात तपासणी सुरू; राष्ट्रीय महामार्गालाही फटका

अकोला-खंडवा रेल्वे मार्गात वाघ्र प्रकल्पाची अडचण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला ते खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामाला मेळघाट वाघ्र प्रकल्पात ब्रेक लागला आहे. पर्यावरणवादी संघटना व वन्यजीव प्रेमींकडून हा मार्ग मेळघाटातून नेण्यास विरोध होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गठित केंद्रीय पर्यावरण समितीकडून रेल्वे मार्ग वाघ्र प्रकल्पाच्या बाहेरून नेण्याबाबतच्या सर्व पर्यायी शक्यतांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी 11 फेब्रुवारीपासून या समितीचे सदस्य मेळघाट वाघ्र प्रकल्पात अभ्यास करीत आहेत. याच प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला हरीत लवादाकडून मान्यता नाकारण्यात आली आहे.


अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. यातील अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापुढे हिवरखेड मार्गे हा मार्ग मेळघाट वाघ्र प्रकल्पातील संरक्षित वन क्षेत्रातून जातो. गेज परिवर्तनानंतर या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे संरक्षित क्षेत्रातील वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांना जिविताला धोका आहे. त्यामुळे हा मार्ग मेळघाट वाघ्र प्रकल्पाच्या बाहेरून नेण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी केली होती. यासंदर्भात केंद्रीय हरित लवादाकडे याचिकाही दाखल करण्यात आली होती. या यचिकेनुसार लवादाच्या ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या 54 व्या बैठकीत रेल्वे मार्गाच्या मेळघाट क्षेत्रातील गेज परिवर्तनाला मान्यता नाकारण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण समितीचे गठण केले. या समितीने 11 फेब्रुवारीपासून मेळघात अभ्यास सुरू केला असून, वाघ्र प्रकल्प किंवा प्रकल्पाच्या बाहेरून मार्ग तयार करण्यासंदर्भातील सर्व शक्यतांची पताळणी समिती करीत आहे.


...तर 30 किलोमीटर लांबी वाढणार
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन करून मेळघाट वाघ्र प्रकल्पाच्या बाहेरून ट्रॅक टाकण्याचा निर्णय झाला तर हिवरखेड ते खंडवापर्यंत पोहोचण्यासाठी सोनाळा, जळगाव जामोद मार्गे 30 किलोमीटर लांबी वाढणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. मेळघाट वाघ्र प्रकल्पाबाहेरून रेल्वे मार्ग गेल्यास सोनाळा, जळगाव जामोद परिसरातील सुमारे दोन लाख नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. शिवाय या परिसरातील संत्रा उत्पादकांसह इतरही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.


रेल्वे मार्ग बदलल्यास ही गावे जोडणार
मेळघाट वाघ्र प्रकल्पातून गेज परिवर्तनासह रेल्वे मार्ग टाकण्यास हरित लवादाने मान्यता नाकारल्यानंतर हा मार्ग वाघ्र प्रकल्पाच्या बाहेरून जाण्याची शक्यता आहे. अशावेळी हा मार्ग अकोट येथून हिवरखेड गावाला वळसा घालून सोनाळा, जळगाव जामोद, उसरनी आणि तुकईथड ही गावे नव्याने रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत.


हे स्टेशन होणार कमी
अकोला-खंडवा दरम्यान रेल्वे मार्ग बदलल्यास महाराष्ट्रातील सोनाळा व जळगाव जामोद हे दोन मार्ग जोडले जातील. मात्र त्यासोबतच हिवरखेड, वानरोड, धुळघाट आणि डाबका ही रेल्वे स्थानके कायम स्वरुपी बंद होतील. हिवरखेड येथील नागरिकांनी हा रेल्वे मार्ग हिवरखेड, जामोद, सोनाळा, तुकईथड मार्गे नेण्याची मागणी केली आहे.