हवालदारांच्या पदोन्नतीचे घोडे अडले कुठे?

अनिल कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर ः राज्यात नुकतीच एक हजार 800 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे पोलिस दलात उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्‍त झाल्या. त्या जागांवर 2013 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हवालदारांना देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिस महासंचालक कार्यालयातून कोणत्याही हालचाली नसल्यामुळे हवालदारांच्या पदोन्नतीचे घोडे कुठे अडले? असा प्रश्‍न राज्यातील तमाम कर्मचारी विचारत आहेत.

नागपूर ः राज्यात नुकतीच एक हजार 800 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे पोलिस दलात उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्‍त झाल्या. त्या जागांवर 2013 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हवालदारांना देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलिस महासंचालक कार्यालयातून कोणत्याही हालचाली नसल्यामुळे हवालदारांच्या पदोन्नतीचे घोडे कुठे अडले? असा प्रश्‍न राज्यातील तमाम कर्मचारी विचारत आहेत.
तत्कालीन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची संधी मिळवून दिली. त्याअनुषंघाने 2013 मध्ये विभागाअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेत उत्तीर्ण पोलिस हवालदारांची संख्या सध्या 12 हजार आहे. पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक होण्यास पात्र असलेल्या उमेदवार सध्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पोलिस महासंचालक कार्यालयातील लालफीतशाही आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये असलेली अनास्था हवालदारांच्या पदोन्नतीच्या आड येत आहे. महासंचालक कार्यालयाने गेल्या काही महिन्यांपूर्वी 2013 अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 350 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी तातडीने मागितली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्या यादीवर विचार करण्यात आला नाही. त्यानंतर पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनीही 2013 चा विषय गांभीर्याने घेऊन आस्थापना विभागाला सूचना दिल्या होत्या. तरीही आतापर्यंत हवालदारांना पदोन्नती देण्यात आली नाही, हे विशेष.

बंदोबस्ताचा ताण कर्मचाऱ्यांवर
नवरात्र उत्सवापासून ते विधानसभा निवडणूक आणि पहिले हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यात पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी लागतील. मात्र, एपीआय म्हणून पदोन्नती झाल्यामुळे उपनिरीक्षकांच्या जवळपास चार हजार रिक्‍त जागा आहेत. बंदोबस्ताचा भार अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर येणार आहे. तर पीएसआय पदासाठी पात्र असलेले 12 हजार हवालदार विभागात कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नती दिल्यास हा प्रश्‍न विनासायास सुटेल.
हवालदार-एएसआयची यादी
राज्यातील पोलिस हवालदार आणि सहायक फौजदारांची सेवाज्येष्ठता यादी येत्या 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस महासंचालक कार्यालयातून तातडीने मागण्यात आली. परंतु, 2013 चे उत्तीर्ण हवालदारांची सेवाज्येष्ठता यादी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागात भोंगळ कारभार सुरू असल्याची चर्चा आहे.
उत्सुकता शिगेला!
पीएआयच्या रिक्‍त जागा आणि बंदोबस्त पाहता आता 2013 पात्रता परीक्षेतील हवालदारांशिवाय महासंचालकांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे पीएसआय ऑडर्रसाठी पात्र उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. राज्यभरातील 12 हजार पोलिस कर्मचारी महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीची यादी जाहीर होण्याची वाट चातकासारखी पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promotion of hawaladar Where are the horses stuck?