esakal | आरक्षण हटविण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेखाली खेचा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

आरक्षण हटविण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेखाली खेचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : एकीकडे आरक्षणाच्या समीक्षेची भाषा होत असताना दुसरीकडे "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'ची भाषा केली जाते. हे सर्व लोक आरक्षणविरोधी आहेत. त्यांचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे. हाच प्रचाराचा मुद्दा झाला पाहिजे. आरक्षण हटविण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेतून हटवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी आदिवासींच्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर डॉ. बळीराम भुरके, प्रशांत बोडखे, निरंजन मसराम, ऍड. स्वाती मसराम, मंगला उके, राजेंद्र मसराम, डॉ. हमराज उईके उपस्थित होते. तत्पूर्वी संविधान चौकातून डॉ. देशपांडे सभागृहापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीचे देशपांडे सभागृहात सभेत रूपांतर झाले. ऍड. आंबेडकर म्हणाले, आदिवासींची जीवनपद्धती, संस्कृती वेगळी आहे. तरी त्यांच्या संस्कृतीवर आक्रमण केले जात आहे. गेल्या 70 वर्षांत आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा होऊ शकला नाही. आदिवासींचे प्रश्‍न आजही कायम आहेत. आरएसएस वैदिक परंपरा कायम करण्याच्या प्रयत्नात आहे. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आजपर्यंत दोन समाजाला आपसात लढवून आपली सत्ता मिळविण्यात आली. परंतु, आता आम्ही झुंजणार नाही. तर आपली सत्ता मिळवू, असा संकल्प घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोध करणारे देशद्रोही
सध्या बळाचा वापर होत आहे. या बळाचा वापर करणाऱ्यांचा विरोध करणाऱ्यांना देशद्राही ठरवले जात आहे. हे योग्य नाही. ब्रिटिश राजवटीत क्रांतिकाऱ्यांना पकडून देणारे आज देशभक्तीची भाषा करीत असल्याची टीका त्यांनी केली. धनगरांना आरक्षण देण्यासाठी सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांनी ब्रिटिश राणीला पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावेळी धनगर समाजातील काही लोकांनी याचा विरोध केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top