एसटी बसने प्रवासानंतर १४ दिवस राहा क्वारंटाईन! काय भावात पडणार ते? 

St bus
St bus

गडचिरोली : अनेक दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लाल परी अर्थात बसची आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण, यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अनेक मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रवासानंतर १४ दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा नियम असल्याने हा बसप्रवास जिकिरीचाच ठरणार आहे. 

जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात राहावी व बाहेरून आलेल्यांच्या संपर्कात स्थानिक नागरिक येऊ नयेत म्हणून एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर खबरदारी व गृह विलगीकरणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. यात एसटीसाठी कमाल प्रवास धारण क्षमतेच्या ५० टक्‍के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अखत्यारीतील ५० टक्‍के बस डेपोला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगीही यावेळी देण्यात आली आहे. नजीकच्या अंतरावरील बसेस तूर्तास सुरू करण्यात येऊन लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. 

बसमध्ये शारीरिक अंतराच्या मर्यादेत कमाल केवळ २२ प्रवाशांना प्रवासाची अनुमती असेल, याहून अधिक प्रवासी आढळल्यास संबंधित आगारप्रमुखांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध ठेवणे, तसेच प्रवासानंतर बस नियमित सॅनिटाईज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनचालक, वाहक व प्रवासी यांनी मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. मास्क वा चेहऱ्यावर रुमाल असल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. तसेच प्रत्येक प्रवाशाने आधार वा इतर कोणतेही ओळखपत्र स्वत:जवळ बाळगणे अनिवार्य असेल.

याबाबत तपासणीची जबाबदारी महामंडळावर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशांचे तपशील व हमीपत्र विहित प्रपत्रात गोळा करण्याची जबाबदारी बसवाहकांना देण्यात आली आहे. याकरिता आवश्‍यक हमीपत्र, बसमध्ये पेन/पेन्सिल आदी पुरवठा करण्याची जबाबदारी विभाग नियंत्रक, एमएसआरटीसी यांची असणार आहे. बाहेर जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या प्रत्येक बसेसमधील प्रवाशांचे तपशील/हमीपत्र विहित प्रपत्रात गोळा करण्यासंदर्भात आवश्‍यक मनुष्यबळ गडचिरोली जिल्ह्याचे आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्ट, नाक्‍यावर पुरविण्याची जबाबदारी ही विभाग नियंत्रक, एमएसआरटीसी, गडचिरोली यांची असणार आहे.

प्रत्येक प्रवाशाला गडचिरोली जिल्हा क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर प्रवासानंतर 14 दिवसांकरिता गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहणे बंधनकारक असेल. या व्यक्तींनी कोविड-19 अंतर्गत विलगीकरणाचे पालन योग्यप्रकारे करावे. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी स्थानिक शासकीय रुग्णालयांमधून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात यावी. तथापि जे प्रवासी कोरोना साथरोगसंदर्भाने रेड झोन/हॉटस्पॉट्‌समधून प्रवास करून येत असतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. याकरिता आवश्‍यक कार्यवाही संबंधित तहसीलदार करतील आदी सूचनांचा यात समावेश आहे. त्यामुळे बसेस सुरू होतील म्हणून आनंदात असलेल्या नागरिकांवर "रोगापेक्षा इलाज भयंकर' असे म्हणण्याची पाळी आली आहे. 

सात दिवस ड्युटी, १४ दिवस क्‍वारंटाईन... 

एका मार्गावर ठराविक शिफ्टमध्ये राज्य परिवहन महामंडळाचे वाहनचालक व वाहक यांची ड्युटी ७ दिवसांकरिता निर्धारित करण्यात आली आहे. ही सात दिवसांची ड्युटी केल्यानंतर त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्तव्याच्या दिवसांपेक्षा दुप्पट दिवस त्यांना क्‍वारंटाईन व्हावे लागणार आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com