कहाणी आदर्श गावाची! मेळघाटातील "राहू' झाले आत्मनिर्भर

rahu
rahu

पळसखेड (जि. अमरावती) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा करण्यापूर्वीच मेळघाटातील आदिवासीबहुल राहू गाव आत्मनिर्भर झाले. कोरोना काळात सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता ग्रामसभेने प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केले. हे सर्व शक्‍य झाले वनहक्क आणि पेसा कायद्याने.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम भागात वसलेले चिखलदरा तालुक्‍यातील 175 कुटुंबाचे हे गाव. गावातील लोकांचे पोट हे शेती व मजुरीवर अवलंबून आहे. चार वर्षांआधी गावात पुरेसा रोजगार नव्हता. लोकांना बाहेरगावी जावे लागत होते, गावात पुरेशा सोयी उपलब्ध नव्हत्या, मात्र गावात एकोपा होता. गावातील प्रत्येक निर्णय ग्रामसभेत एकजुटीने घेतले जात होते. दरम्यान, खोज संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनी राहू गावाला भेट दिली. त्यांना 2014 च्या वनहक्क कायद्यानुसार जंगलातील संसाधनावर स्थानिक आदिवासींचे काय अधिकार आहेत, ते पटवून दिले.

राहू गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या 4 हजार 500 हेक्‍टर जंगलाचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यावेळी जंगलात मोठ्या प्रमाणत बांबू असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन बांबू कटाईसाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

वनहक्क व पेसा कायद्यांतर्गत त्यांना कटाईची मंजुरी मिळाली. त्यानंतर गावातील प्रत्येक कुटुंबातील लोक या योजनेत सहभागी झाले. बांबू कटाईसाठी जंगलाचे चार भाग करण्यात आले. प्रत्येक वर्षी एका भागातील बांबू कापण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. बांबू कापून एकत्रित करेपर्यंत प्रतिबांबू नऊ रुपये दर ठरविण्यात आला. सुरुवातीच्या काळात संपूर्ण कटाईचा खर्च हा ग्रामपंचायतने केला. पहिल्याच वर्षी 22 लाखांची बांबू कटाई झाली आणि त्यातून त्यांना निव्वळ नफा 16 लाख रुपये शिल्लक राहिले. त्याच्या पुढल्या वर्षी 45 लाख, त्यानंतर 1 कोटी, अशी राहू गावाची प्रगती होत गेली.

हळूहळू गावात पैसा यायला लागला व गावात ग्रामसभेच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात आल्या. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 20 गॅस कनेक्‍शन दिले, शाळेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित केली. हा सर्व खर्च करून ग्रामपंचायतमध्ये 40 लाख रुपये जमा आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात सर्व लोक रोजगाराच्या शोधात असताना ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 10 हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला व प्रत्येकाच्या खात्यात रक्कम जमा झाली. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाआधीच हे गाव आत्मनिर्भर झाले होते.

गेल्या चार वर्षांत राहू गावाने चार कोटींची कमाई केली आहे. उत्पन्नातील काही भाग मजुरी, वाहतूक आणि इतर कामांवर खर्च केला जात आहे. त्यातून जवळपास तीन कोटींचा निव्वळ नफा गावाने कमविला आहे.

राहू गावाची प्रगतीच
लॉकडाउन काळातही कामातून प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. काहींनी याच पैशातून गॅसजोडणी करून घेतली. कोरोनामुळे जग संकटात सापडले असताना राहू गावाची प्रगती उल्लेखनीय आहे.
-पौर्णिमा उपाध्याय, पदाधिकारी, खोज.

सोशल डिस्टिन्सिंग पाळले
लॉकडाउन काळामध्ये गावातील एकही मजूर बाहेर आणि बाहेरील व्यक्ती गावामध्ये येणार नाही, असा निर्णय झाला. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनेटायझरचा वापर करून जवळपास 100 जण बांबू कटाईच्या कामाला लागले. आम्ही आमचा रोजगार सुरू ठेवला.
मुंगीलाल भुसूम, सचिव, ग्रामसभा समिती

गावाचा विकस सुरू
कोरोना सारख्या संकटाच्या काळात गावातील लोक आत्मनिर्भर आहेत. हे सर्व ग्रामसभेच्या माध्यमातून शक्‍य झाले. आज ग्रामपंचायत लाखो रुपये कमवित आहे व गावाचा विकास होत आहे.
सज्जूलाल कासदेकर, सरपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com