अबब! चक्‍क सात फुटांहून उंच झाली राजगिरा वनस्पती 

file photo
file photo

गडचिरोली : राजगिरा वनस्पती अनेकांच्या अंगणात उगवलेली असते. पण, ती खूप उंच क्वचितच वाढते. मात्र, येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी हरिदास होकम यांच्या अंगणातील राजगिरा वनस्पती सात फुटांहून अधिक उंच वाढली आहे. त्यामुळे हे राजगिऱ्याचे झाड सर्वत्र कौतुकाचा विषय झाले असून, त्याला बघण्यासाठी गर्दी होत आहे. 

पोलिस उपविभागात उपनिरीक्षक असलेले हरिदास होकम काही वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. ते गडचिरोलीतील गोकूलनगर परिसरात राहतात. पोलिस विभागात अनेक वर्षे काम करणारे होकम यांनी आपली वृक्षवल्लींची आवड अनेक वर्षांपासून जपली आहे. त्यांनी आपल्या अंगणात केळी, सीताफळ, पिंपळ, पेरू, आंबा, पपई या झाडांसोबत अनेक फुलझाडे व औषध वनस्पती जपल्या आहेत. यासोबतच काही राजगिऱ्याची रोपेही त्यांनी लावली होती. दोन वर्षांपूर्वी लावलेले राजगिऱ्याचे एक रोप चक्‍क सात फुटांहून अधिक उंच झाले आहे. एरवी कोणतीही वनस्पती एवढी उंच वाढत नाही. पण, होकम यांनी या वनस्पतीची योग्य काळजी घेत निगा राखल्याने ही वनस्पती खूप उंच वाढली आहे. राजगिऱ्याची पाने चवळीच्या भाजीप्रमाणेच खाण्यासाठी वापरतात. या झाडामुळे होकम यांना नियमित भाजी मिळत आहे. अनेक जण अंगणात राजगिरा वनस्पती लावत असले, तरी त्याची फारशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे ही वनस्पती लवकरच मरते. काही जण फक्त त्याला शोभेची वनस्पती म्हणूनच लावतात. पण, चांगली काळजी घेतल्यास ही वनस्पती ताडमाड उंच वाढून आपली अन्नपूर्तीसुद्धा करू शकते. म्हणून वृक्षवल्लींवर प्रेम करावे, असे आवाहन हरिदास होकम यांनी केले आहे. 

आयुर्वेदिक उपयोग... 
आयुर्वेदात राजगिरा रुचिवर्धक मानला असून, पचनाचा त्रास व नैराश्‍यातही उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. शिवाय ही वनस्पती रक्तशोधक असल्याने रक्तपित्त, शीतपित्त, त्वचाविकार यातही उपयोगी पडते. स्तन्यवर्धनाचा गुण असल्याने ज्या आयांना बाळंतपणानंतर नीट दूध येत नाही त्यांनी राजगिऱ्याचे सेवन करावे, असे सांगितले आहे. ही वनस्पती मल:सारक असून बद्धकोष्ठ व संग्रहणी या व्याधी दूर करते. शिवाय हृदयबलप्रद, नेत्रशक्ती वाढवणारी, पंडुरोग व अतिरिक्त चरबी कमी करण्यावरही उपयुक्त आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com