esakal | विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड
sakal

बोलून बातमी शोधा

raju kendre

विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : ग्रामीण भागातील एक विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे शहरात गेला. मात्र, परिस्थितीशी हार मानत दोन पावले मागे घेत आपली स्वप्ने पोथडीत गुंडाळून गावी परत आला. मुक्त विद्यापीठातून (open university) शिक्षण घेत उपेक्षित वर्गातील मुलांसाठी एकलव्य स्पर्धा परीक्षा नावाने ॲकेडमी सुरू केली. दहा वर्षांच्या संघर्षानंतर दिवसरात्र घेतलेल्या परिश्रमाला फळ आले. पुणे रिटर्न म्हणून हिणवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याची निवड उच्चशिक्षणासाठी (higher education) लंडन विद्यापीठात (london university) करण्यात आली आहे. (raju kendre from vidarbha selected for higher education in london university)

हेही वाचा: नागरिकांत संताप; नागपुरात चार दिवसांपासून लसीकरण ठप्प

राजू आत्माराम केंद्रे असे या जिद्दी विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील प्रिंप्री (खंदारे) येथील रहिवासी असला, तरी यवतमाळ ही त्याच्या पंखाला भरारी देणारी भूमी ठरली. राजूला दहावी व बारावीत चांगले गुण मिळाले. ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे पुस्तक त्याच्या वाचनात आले आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय उराशी बाळगून राजू केंद्रे याने पुणे गाठले. मात्र, त्या ठिकाणी आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने आपले गाव गाठले. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मेळघाटात जाण्याची संधी मिळाली. सुरुवातीला स्वयंसेवक व मेळघाट मित्र म्हणून काम करताना सहकाऱ्यांचे नेटवर्क उभे राहिले. मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये असताना राजू अनेक माणसांशी जोडला गेला. फेलोशिपदरम्यान राजूने यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात येणाऱ्या पारधी बेड्यावर काम केले. राज्य सरकारने शॉर्ट फिल्म बनवून राजूच्या कामाची दखल घेतली.

यवतमाळमध्ये सावित्री ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करीत असताना एकलव्य महाराष्ट्र नावाने एक शैक्षणिक चळवळ सुरू केली. मागील तीन वर्षांत एकलव्यचे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. ब्रिटिश सरकारची चेवनिंग शिष्यवृत्ती मिळाली आहे. जगातील १६० देशांतील युवांना नेतृत्व करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. ६३ हजार युवकांमधून एक टक्क्यात राजू केंद्रेचा समावेश झाला आहे. विदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याच मायभूमीत येऊन काम करायचे, असेही त्याने ठरविले आहे.

ही स्कॉलरशिप एकलव्यच्या शैक्षणिक चळवळीचा पाया असणार आहे. प्रवासाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. पल्ला आणखी गाठायचा आहे. बहुजन, उपेक्षित समाजातील मुले शिकली पाहिजे, यासाठीच माझा पुढेही प्रयत्न राहील.
-राजू केंद्रे, यवतमाळ
loading image
go to top