एकाच घरी नांदतो राम आणि रहिम! 

राघवेंद्र टोकेकर 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

सलीम शेख मूळचे आष्टीचे. वडील एमबीबीएस डॉक्‍टर होते. पण सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. त्यांच्या घरी दिवाळीत लक्ष्मीपूजन व्हायचे अन्‌ किमान शंभर माणसे तरी फराळासाठी यायची, अशी आठवण सलीम शेख यांनी सांगितली. वडिलांकडून मिळालेला हा वसा त्यांनी असाच चालू ठेवला. 

नागपूर : "नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी, मग हिंदू असो ख्रिश्‍चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे, दे वरचि असा दे...या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे... हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे...दे वरचि असा दे' राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओळींचा अर्थ मोहम्मद सलीम शेख या "हिंदुस्थानी' मुस्लिम बांधवाला समजला. ते पाच वेळचे नमाजी आहेत. पण, दिवाळीचे लक्ष्मीपूजनही तितक्‍याच भक्‍तिभावाने करतात. ते पाच कलमे गातात अन्‌ तितक्‍याच मंजूळ स्वरात आरत्यादेखील म्हणतात. ईदला त्यांच्या घरी हिंदूंची गर्दी जमते, तर गुढीपाडव्याला ते नवविचारांची गुढी उभारतात. 

वडिलांकडून मिळालेला हा वसा 

मोहम्मद सलीम शेख सांस्कृतिक क्षेत्रात भक्‍तिगीतांचे राजे आहेत. त्यांचे शेकडो चाहते आहेत. त्यांना मुस्लिम संस्कृतीची सर्व वैशिष्ट्ये ठाऊक असून, संत गजानन महाराजांच्या भक्‍तिभावाशी त्यांनी अद्वैत साधले आहे. सलीम शेख मूळचे आष्टीचे. वडील एमबीबीएस डॉक्‍टर होते. पण सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. त्यांच्या घरी दिवाळीत लक्ष्मीपूजन व्हायचे अन्‌ किमान शंभर माणसे तरी फराळासाठी यायची, अशी आठवण सलीम शेख यांनी सांगितली. वडिलांकडून मिळालेला हा वसा त्यांनी असाच चालू ठेवला. 

आईचे माहेर हिंदू कुटुंबातील 

लहानपणी पितृछत्र हरवलेले सलीम शेख मोठी बहीण, धाकटा भाऊ अन्‌ आईसोबत नागपुरात आले. आईचे माहेर हिंदू कुटुंबातील होते. त्यांच्या शेजारी राहण्याचा फायदा झाला अन्‌ बघता बघता मोहम्मद सलीम शेख यांच्यावर धर्माचे नव्हे हिंदुस्थानी संस्कृतीचे संस्कार झाले. आजोळी दिवे लागणीच्या वेळी "दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार' श्‍लोक म्हणून मी घरी जायचो अन्‌ नमाज अदा करून अभ्यासास बसायचो, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या. 

सांस्कृतिक समृद्धीकडे वाटचाल

वर्षे पालटली तशी सलीम शेख सांस्कृतिक समृद्धीकडे वाटचाल करीत राहिले. नमाजातील कलमांचा अर्थ आणि श्‍लोकांचा भावार्थ त्यांनी जाणून घेतला. हा अर्थ एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. राजकीय लोक स्वार्थासाठी सांस्कृतिक एकात्मतेला धक्‍का लावतात. मात्र, अशातही देशात मोहरम आणि गणेशोत्सव एकाच मंडपात साजरे होतात. हीच "हिंदुस्थानी संस्कृती' आहे. मुस्लिम वेशातील आई कौतुक म्हणून तिच्या मुलाला कृष्णाचा वेश घालते. हीच ती सांस्कृतिक एकात्मता असून, याच विचारांचे पाईक प्रत्येकाने झाले पाहिजे, असे मत ते व्यक्‍त करतात. 

"इस्लामिक आतंकवाद' शब्द खटकतो 

इस्लामिक आणि आतंकवाद हे दोन्ही विरोधाभासी शब्द आहेत. हाच शब्द मला खटकतो. इस्लामिक संस्कृती शांतता व अहिंसेचा धर्म आहे. घर बांधताना शेजाऱ्याला त्रास होईल म्हणून त्याची परवानगी घ्या, असे इस्लाममध्ये सांगितले जाते. ही संस्कृती पाळणाऱ्याला वेदना होतात. तो हिंसाचार करूच शकत नाही. तर हिंसाचार करणारे माणूस राहूच शकत नाहीत, अशा भावना मोहम्मद सलीम शेख यांनी व्यक्‍त केल्या. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram and Rahim live in one house!