मेळघाटात दिसतोय लुप्त होत चाललेला रानपिंगळा, पक्षीप्रेमींना आनंद

ranpingala.
ranpingala.

अमरावती : लाईफ सायकलमध्ये प्रत्येक जीवाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. मात्र मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे या जीवनचक्रातील अनेक साखळ्या निखळून जाताहेत. यातीलच एक प्रजाती म्हणजे रानपिंगळा.

भारतातून लुप्त होत चाललेला रानपिंगळा ही चिंतेची बाब असून मेळघाटात रानपिंगळा या पक्षाचे अस्तित्व जाणवले आहे. निसर्ग प्रेमींसाठी ही बाब सुखद धक्का देणारी आहे. या दुर्मिळ पक्षाच्या अस्तित्वासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पुण्याच्या वाइल्डलाइफ रिसर्च ऍण्ड कन्झर्वेशन सोसायटीच्या संशोधक व वन्यजीव अभ्यासक डॉ. प्राची मेहता आणि जयंत कुलकर्णी यांनी  दिली.

डॉ. प्राची मेहता यांनी सांगितले, की २००५ पासून रानपिंगळ्याचा अधिवास व त्याची जीवनशैली याचा अभ्यास करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच गुजरात या राज्यांमध्ये रानपिंगळ्यासाठी विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले असून नवीन ठिकाणी रानपिंगळ्याच्या अस्तित्वाचा शोध लागला आहे. रानपिंगळ्याचे भ्रमणक्षेत्र, अधिवासाचा वावर, भ्रमंतीची दिनचर्या याविषयांचा अभ्यास करण्यासाठी रानपिंगळ्याला कलर बॅण्ड घालण्याची परवानगी प्राप्त झाल्यानंतर मध्य प्रदेशात ५० तर मेळघाटात १८ रानपिंगळ्यांचे सुरक्षितपणे कलर बॅण्डिंग करण्यात आले.

या बॅण्डिंगचा आता चांगलाच उपयोग होत असून बॅण्डिंग करण्यात आलेले सर्व पक्षी सुरक्षितपणे विहार करीत असल्याचे डॉ. प्राची मेहता यांनी सांगितले. संशोधनाच्या माध्यमातून जी माहिती मिळत आहे त्यातून रानपिंगळा व इतर घूबड प्रजातींचे व्यवस्थापन व संवर्धनासाठी वनविभागाला मदत होत आहे.
दरम्यान, बॅण्ड लावताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. पक्ष्याला इजा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. शास्त्रोक्त पद्धत वापरण्यात येते, त्यासाठी प्रशिक्षणसुद्धा दिल्या गेले आहे. घुबडांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आदिवासी समाजासाठी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकरिता दोन कार्यशाळादेखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मेळघाट ठरतेय रिसर्च बेल्ट
रानपिंगळा तसेच इतर घूबड प्रजातींवर मेळघाटमधील चौराकुंड येथे अभ्यास सुरू आहे. आम्ही त्यांची इकॉलॉजी व त्यांच्या जीवनावश्‍यक गरजांचा अभ्यास करीत असून हे सर्व घूबड जातीचे पक्षी एकाच क्षेत्रात कसे राहू शकतात व तेथील साधनांची ते आपसांत कशी वाटणी करून घेतात, याचे निरीक्षण करीत असल्याचे जयंत कुलकर्णी व डॉ. प्राची मेहता यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com