अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांदुळ वितरण करण्यात येणार आहे. रास्तभाव दुकानांमधून सदर तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी काही कार्डधारकांला मिळणारे तांदुळ 60-70 किलोपर्यंत असल्याने लाभार्थी तांदुळाची उचल करुन ते खुल्या बाजारात विकत आहेत. त्याबदल्यात लाभार्थी पैसे अथवा इतर वस्तुंची खरेदी करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदुळाचे वाटप सुरू झाले आहे. या योजनेत प्राधान्य गटातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना 5 किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.

आवश्यक वाचा - Lockdown : बस सुरू, आव्हाने कायम; एसटीवर आता कर्मचाऱ्यांच्या वेतनासह या खर्चाचाही भार

संबंधित लाभार्थ्यांना कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानातून सदर तांदुळाचे वितरण करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत तांदुळाचे वाटप ई-पॉस मशिनद्वारे व मोफत होत आहे. मात्र लाभार्थ्यांना मोफतमध्ये मिळणारे तांदुळ 60 ते 70 किलोपर्यंत असल्याने लाभार्थी मोफतचा तांदुळ खुल्या बाजारत विकून त्याबदल्यात इतर वस्तुंची खरेदी करत आहेत.

असे होत आहे वाटप

  • अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत कुटुंब लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर शिधापत्रिकेवर एक सदस्य असल्यास पाच किलो, दोन सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे तांदुळाचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
  • प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना देण्यात येणारे पाच किलो प्रति सदस्य प्रमाणात तांदुळाचे वितरण केल्यानंतर प्रति सदस्य पाच किलो तांदुळाचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

रेशन दुकानातून तांदुळाची उचल
गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. कार्डधारक रेशन दुकानातून तांदुळाची उचल सुद्ध करत आहेत. परंतु त्यानंतर लाभार्थ्यांनी मोफतचा तांदुळ बाजारात विकल्यास पुरवठा विभाग लाभार्थ्यांवर कार्यवाही करु शकत नाही. जिल्ह्यात असे प्रकार निदर्शनास येत आहेत.
- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration's Free rice for sale in the open market in akola district