‘नाफेड'च्या कापूस खरेदीसाठी उद्यापासून नोंदणी, शेतकऱ्यांनी घ्यावी दखल

गिरिधर ठेंगे
Sunday, 27 September 2020

खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने नोंदणी लवकर सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बॅंकेच्या पासबुकची छायांकित प्रत, कापूस लागवडीची नोंद असलेला सातबारा उतारा, आठ ‘अ' आदी कागदपत्रांसह बाजार समितीत नोंद करायची आहे.

आरेगाव (जि. यवतमाळ) : खरीप हंगामातील कापूस ‘नाफेड'ला विक्री करण्यासाठी पुसद येथील बाजार समितीत येत्या सोमवारपासून (ता. २८) कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, ही नोंदणी येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार आहे, अशी माहिती पुसद बाजार समितीने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

भ्रमणध्वनीवरून देणार माहिती

खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने नोंदणी लवकर सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बॅंकेच्या पासबुकची छायांकित प्रत, कापूस लागवडीची नोंद असलेला सातबारा उतारा, आठ ‘अ' आदी कागदपत्रांसह बाजार समितीत नोंद करायची आहे. खरेदी प्रारंभ होताच शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार आपला कापूस विक्री करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून एकदिवस आधी कळविण्यात येणार आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना मोठी कसरत

मागील वर्षी ‘नाफेड'ला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. शिवाय जून महिना अखेरपर्यंत ही खरेदी सुरू ठेवावी लागली होती. शिवाय शेतकऱ्यांच्या सातबारावर व्यापाऱ्यांचा कापूस विक्री केल्याचे प्रकारही काही ठिकाणी उघडकीस आले होते.

जाणून घ्या  : आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच! जाणून घ्या कोविड रुग्णांसाठी प्राणायाम

शिस्तबद्ध पद्धतीने कापूस खरेदीचे नियोजन
यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची आवश्‍यक ती काळजी आमच्याकडून घेतली जाणार आहे. सोबतच शिस्तबद्ध पद्धतीने कापूस खरेदीचे नियोजन बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
- शेख कौसर, सभापती, बाजार समिती, पुसद (जि. यवतमाळ)

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Register for NAFED's cotton purchase from tomorrow