माश्‍यांच्या प्रजोत्पादनावर नेमका कशाचा होतोय दुष्परीणाम? वाचाच

मिलिंद उमरे
Wednesday, 9 September 2020

मोठी धरणे सिंचनासाठी उपयुक्त असली तरी ती नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवत आहेत. तसेच अंडी देण्यासाठी नदीच्या उगमाकडे लांब अंतराचे स्थलांतर करणाऱ्या मासोळ्यांच्या मार्गामध्ये धोंडही ठरत आहेत. त्यामुळे अनेक माशांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होतो आहे.

गडचिरोली : जीवो जीवस्य जीवनम् हे निसर्गचक्राचेच सत्य आहे. लाईफ सायकलमध्ये छोट्यातछोट्या जीवाचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातीला एक म्हणजे मासे.

देशच नव्हे तर जगभरात सिंचन, वीज व पाणीपुरवठा आदी गरजा भागविण्यासाठी नद्यांवर महाकाय धरणांची निर्मिती करण्यात येते. पण, या महाकाय धरणांच्या अडथळ्यांमुळे नदीतील अनेक दुर्मिळ मासोळ्यांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. माशांच्या अनेक प्रजाती अंडी घालण्यासाठी नदीच्या उगमाकडे स्थलांतर करतात. पण, या स्थलांतरणात धरण आडवे येत असल्याने त्यांना इच्छित स्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होतो आहे.

मोठी धरणे सिंचनासाठी उपयुक्त असली तरी ती नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवत आहेत. तसेच अंडी देण्यासाठी नदीच्या उगमाकडे लांब अंतराचे स्थलांतर करणाऱ्या मासोळ्यांच्या मार्गामध्ये धोंडही ठरत आहेत. त्यामुळे अनेक माशांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होतो आहे.

युरोप, अमेरिकेच्या नदीतील सामन प्रजातीच्या माशांचे लांब पल्ल्याचे स्थलांतर जगप्रसिद्ध आहे. त्यासोबतच भारतात आढळणारे अनेक मासेही स्थलांतर करतात. पावसाळ्यात जेव्हा नद्या, नाल्यांना पूर येतो तेव्हा चढणीचे मासे मिळतात. हे मासे नेमके नदी प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात असतात. काही मासे उथळ पाण्यातून प्रवास करतात. त्यावेळेस त्यांना पकडणे सोपे असल्याने माणसांसह जंगलातीलही अनेक प्राण्यांना मेजवानी मिळते. पण, हे मासे हा अवघड प्रवास आपल्या पुढच्या पिढ्या जन्माला घालण्यासाठी करतात. त्यांचा हा प्रवास सुखकर होऊन त्यांना अंडी घालता आली, तरच त्यांच्या पुढच्या पिढ्या जन्माला येऊ शकतात.

पण, अनेक मासे धरणांचा अडथळा पार करून पुढे जाऊ शकत नाहीत. पर्यायाने त्यांचा प्रजननासाठीचा प्रवास खंडित होण्याची शक्‍यता असते. यावर जगभरात अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. ही धरणे मासे सहज पार करू शकतील अशा साखळ्या, शिडी, उद्‌वाहन (लिफ्ट) आदी कृत्रिम साधनांचेही प्रयोग होत आहेत. पण, कुठेच याला विशेष यश आलेले नाही. खरेतर भारतातील बहुतांश भागांत नद्यांसोबतच तलाव बहुउपयोगी होते. पण, तलांवाकडे दुर्लक्ष करून धरणांची संख्या वाढवण्यावरच प्रत्येक सरकारची भिस्त असते. त्यामुळे अनेक दुर्मिळ प्रजातीचे मासे कायमचे नष्ट होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

सविस्तर वाचा - झोपण्याच्या सवयींवरून कळते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि बरेच, जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी

भारतातील स्थलांतर करणारे मासे                      स्थलांतराचा काळ
 महासिर                                                    ऑगस्ट -सप्टेंबर
 टोर बार्ब (पोष्टी)                                        मे - ऑगस्ट
 कॉमन स्नोट्राऊट (नेवार किंवा लॉटी)             मार्च ते मे
 डिन्वाह स्नोट्राऊट (शिरूली)                        मार्च - मे
 हिल्सा                                                    जुलै - सप्टेंबर
 पॅनागस कॅटफिश (झरंग)                         जून - ऑगस्ट
 कतला                                                  मे - ऑगस्ट
 रोहू                                                      मे - ऑगस्ट
 मिरगल                                                मे-ऑगस्ट
 मॉटल्ड ईल (तंबू)                                   जून -जुलै
 ब्लॅक रोहू (गावठी रोहू)                            मे-ऑगस्ट

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reproduction of fish is effected due to dam on river