चल मेरी रिक्षा! अमरावतीच्या साजिद खानने तयार केली पेट्रोलवर चालणारी रिक्षा

सुधीर भारती
मंगळवार, 7 जुलै 2020

सामान्यपणे रिक्षा चालक पायडलचा रिक्षा चालवून आपले पोट भरतात. पायडलच्या रिक्षामुळे कालांतराने अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी सारखे विकार जडतात आणि ते मजुरी करू शकत नाहीत. आपलेही तसे होऊ नये, असा विचार करीत साजिद खान यांनी चार वर्षांपूर्वी एका मेकॅनिक मित्राचा सल्ला घेतला.
 

अमरावती : पेट्रोलवर चालणारी रिक्षा आणि त्याचे ऍव्हरेज प्रति लिटर 40 किलोमीटर. हे ऐकून जरा नवलच वाटते. मात्र अमरावतीच्या एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षाचे रुपांतर पेट्रोल रिक्षात केले आहे. विशेष म्हणजे पेट्रोलवर चालणारा ही रिक्षा एका स्वीचद्वारे सायकल रिक्षासुद्धा होऊ शकते. हा अनोखा प्रयोग करणाऱ्या युवकाचे नाव साजिद खान अहमद खान असून तो छायानगर परिसरात राहतो.

सामान्यपणे रिक्षा चालक पायडलचा रिक्षा चालवून आपले पोट भरतात. पायडलच्या रिक्षामुळे कालांतराने अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी सारखे विकार जडतात आणि ते मजुरी करू शकत नाहीत. आपलेही तसे होऊ नये, असा विचार करीत साजिद खान यांनी चार वर्षांपूर्वी एका मेकॅनिक मित्राचा सल्ला घेतला.

रिक्षाला मोपेडचे इंजिन लावता येऊ शकेल का?, यावर त्यांचे प्रयोग सुरू झाले. सुरुवातीला एक जुनी मोपेड त्यांनी विकत घेतली. त्या मोपेडचे इंजिन काढून ते रिक्षाच्या खालच्या भागाला जोडले. पेट्रोलची टाकी सीटच्या खाली बसविण्यात आली आणि त्यातून पेट्रोलचा सप्लाय देण्यात आला. विशेष म्हणजे याच ठिकाणी एक स्वीच लावण्यात आले. ज्यावेळी पेट्रोलची गरज नसेल किंवा पेट्रोल नसेल तेव्हा या स्वीचचा वापर करून तीच रिक्षा सायकल रिक्षामध्ये रुपांतरित केली जाऊ शकते.

यासाठी साजिद खान यांना जवळपास 20 हजारांचा खर्च आला. आता या पेट्रोल रिक्षाच्या माध्यमातून अतिशय जलदगतीने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. विशेष म्हणजे पेट्रोलची ही रिक्षा 40 किलोमीटरचा ऍव्हरेज देते, असा दावा साजिद खान यांनी केला. दवाबाजार येथील भगवती मेडिकल्समध्ये ते अनेक वर्षांपासून सेवा देतात.
हेही वाचा - रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले
मित्रांचेही योगदान
रिक्षा तयार केल्यानंतर अनेकांनी माझे कौतुक केले. मी माझ्या मित्रांच्या मदतीने पेट्रोलवर चालणारी रिक्षा तयार केली. त्यामध्ये त्यांचेसुद्धा महत्त्वाचे योगदान आहे. या रिक्षाच्या वापरामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी सारखी कुठलीही तक्रार नाही. उलट कमीतकमी वेळात माल दुसऱ्या ठिकाणी हलविता येतो.
साजिद खान अहमद खान, रिक्षाचालक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riksha on petrol, New invention