पावसाळ्यात रस्ते ठरताहेत सापांसाठी मृत्यूपथ...वाचा 

मिलिंद उमरे 
Friday, 24 July 2020

भारतात नाग, घोणस, फुरसे, मण्यार या चार प्रजाती सोडल्या, तर बहुतांश साप निमविषारी किंवा बिनविषारी असतात. उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचे भक्षण करून साप धान्याचे रक्षण करत शेतकऱ्यांना मदत करतात.

गडचिरोली : बहुतांश माणसे सापाला घाबरत असले, तरी साप आणि मानवाचे नाते अनादी काळापासून आहे. मग, इव्हला ज्ञानाचे फळ चाखण्यासाठी उद्युक्त करणारा बायबलमधील साप असो की, तक्षक, वासुकी, अनंत, कर्कोटक, शेषनाग अशा विविध नावांनी हिंदू धर्मात उल्लेखला जाणारा साप असो. मानवी संस्कृती आणि एकूणच जैवविविधतेत सापांचे महत्त्वाचे स्थान आहे. पण, मानवाने सुखकर प्रवासासाठी निर्माण केलेले गुळगुळीत रस्ते पावसाळ्यात सापांसाठी मृत्यूपथ ठरत असून दरवर्षी पावसाळ्यात सापांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. 

हे वाचा— "एलेक्‍सिस हॉस्पिटलवरील कारवाईमध्ये पक्षपात' 

भारतात नाग, घोणस, फुरसे, मण्यार या चार प्रजाती सोडल्या, तर बहुतांश साप निमविषारी किंवा बिनविषारी असतात. उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचे भक्षण करून साप धान्याचे रक्षण करत शेतकऱ्यांना मदत करतात. म्हणूनच भारतात नागपंचमीला सापाची पूजा केली जाते. पण, एकीकडे सापांचे पूजन होत असताना त्याच्या संरक्षणाचा कोणताच विचार होताना दिसत नाही. मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून पूर्वीच्या अरुंद डांबरी सडका आता चौपदरी, सहा पदरी, आठ पदरी महामार्गांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. हे मार्ग सुखकर प्रवासासाठी गुळगुळीत करण्यात आले आहेत. पण, सरपटणाऱ्या सापांना या गुळगुळीत रस्त्यावर विशेष पकड मिळत नाही. त्यामुळे हे रस्ते पार करताना त्यांचा वेग मंदावतो आणि या रस्त्यांवरून भरधाव धावणारी वाहने त्यांना चिरडून पुढे निघून जातात. तुम्ही भुरभुरता पाऊस सुरू असताना सकाळी किंवा रात्री एखाद्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने गेलात, तर तुम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी विविध प्रजातींच्या सापांचे मृतदेह दिसतील. यात अनेक दुर्मिळ सापांचाही समावेश आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातही रस्त्यावर सापांचे मरण्याचे प्रमाण मोठे आहे. सापांचे हे मृत्यूसत्र पावसाळ्यातच नव्हे, तर उन्हाळ्यातसुद्धा वाढताना दिसते. पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर पकड न मिळाल्याने त्यांचा वेग मंदावतो, तर उन्हाळ्यात जंगलातून जाणाऱ्या मार्गावर ते थंड मातीतून अचानक तप्त रस्त्यावर येतात. उन्हाने तापलेल्या रस्त्यावर त्यांचे संपूर्ण शरीर खालून भाजायला लागते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अक्षरश: भाजून त्यांचा मृत्यू होतो. उन्हाळ्यात असे मृत्यू रोखणे कठीण असले, तरी पावसाळ्यात आपण वाहनाचा वेग कमी ठेवल्यास मानवी अपघातही कमी होतील आणि सापांचे प्राणही वाचू शकतील. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. 

काय गरज आहे ? 
साप, तर माणसांना चावतात आणि माणसे मरतात. मग, त्यांना वाचविण्याची गरज काय, असा प्रश्‍न अनेकजण विचारतात. खरेतर एकूण जैवविविधतेत सापाचे महत्त्व आहेच. साप उंदीर, घुशीसारखे उपद्रवी प्राणी नष्ट करत असल्यामुळेही उपयोगी आहे. पण, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषारी सापाने दंश केला, तर त्यातून बरे होण्यासाठी जे औषध दिले जाते ते सापांच्या विषापासूनच तयार केलेले असते. घोणससारख्या सापांचे विष हे रक्तविष (हिमोटॉक्‍सिक) प्रकारातील असते. रक्त गोठविण्याची क्षमता या विषात असते. म्हणून अपघातात अतिरक्तस्राव होत असताना जी औषधे दिली जातात त्यात घोणसाच्या विषाचा अंश असतो. म्हणून सापांपासून वाचायचे असले आणि आपला जीव वाचवायचा असला, तरी साप वाचविणे आवश्‍यकच आहे. 

-संपादन  : चंद्रशेखर महाजन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads are paved in the rainy season, death path for snakes ... read on