मलनिःसारण योजनेच्या कामात रस्ते झाले खराब, अपघाताची वाढली भीती

मिलिंद उमरे
Saturday, 19 September 2020

मलनिःसारण योजनेचे काम करताना कुठलेही नियोजन दिसून येत नाही. आज इथे खोदकाम, तर उद्या तिथे खोदकाम अशा पद्धतीने हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या योजनेची भूमिगत पाइपलाइन टाकताना रस्ता मधोमध फोडूनच ती टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेले शहरातील अंतर्गत रस्ते आता दयनीय झाले आहेत.

गडचिरोली : शहरात महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनि:सारण योजनेचे काम सुरू असले; तरी या यंत्रणेची पाइपलाइन टाकण्यासाठी शहरातील अंतर्गत रस्ते बिनधास्त तोडण्यात येत आहेत. त्यानंतर या रस्त्यांची थातूरमातूर डागडुजी होत असल्याने या रस्त्यांचीच वाट लागत असल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली शहरातील नागरिकांच्या शौचातील घाण पाणी एका भूमिगत पाइपलाइनद्वारे शहराबाहेर फेकले जावे, या हेतूने ही कोट्यवधींची मलनि:सारण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना तयार झाल्यास शहरात घाण होणार नाही, डासांची निर्मिती होणार नाही, रोगराई पसरणार नाही, असे फायदे या योजनेचे सांगण्यात आले. पण, ही योजना सुरुवातीपासूनच वादात राहिली.

कसेबसे योजनेचे काम सुरू झाले असले; तरी ते अतिशय कासवगतीने सुरू आहे. हे काम करताना कुठलेही नियोजन दिसून येत नाही. आज इथे खोदकाम, तर उद्या तिथे खोदकाम अशा पद्धतीने हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, या योजनेची भूमिगत पाइपलाइन टाकताना रस्ता मधोमध फोडूनच ती टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेले शहरातील अंतर्गत रस्ते आता दयनीय झाले आहेत. हे रस्ते खोदताना जेवढी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता रस्ता दुरुस्तीत अजिबात दाखवली जात नाही.

असं घडलंच कसं : गाडी खराब झाली आहे असे म्हणत मागितली लिफ्ट आणि गाडी घेऊन झाला पसार; जाम येथील घटना

रस्ते खोदले, अपघात वाढले

रस्ते खोदल्यानंतर अनेक दिवस तसेच ठेवण्यात येते. मग, त्यात पावसाचे पाणी साचून त्याला नालीचे रूप येते. आजूबाजूला चिखल निर्माण होतो. मार्गाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होतात. हे सगळे झाल्यावर हळूच कधीतरी त्यात पाइप टाकण्यात येतो. मग, त्यावर माती टाकून वर सिमेंटचे पाणी मारून रस्ता पूर्ववत झाल्याचे दाखवण्यात येते. पण, या थातूरमातूर डागडुजीने हे रस्ते पूर्ववत कसे होणार, याचे उत्तर कुणीही देत नाही.

दाखवण्यापुरती केली डागडुजी

विशेष म्हणजे ही डागडुजी अशीच कच्ची राहिल्यास मोठ्या वाहनाने हे रस्ते पुन्हा उखडून मलनि:सारणाच्या भूमिगत पाइपलाइनलाच धोका पोहोचण्याची शक्‍यता आहे. अशा कोणत्याही कारणाने ही पाइपलाइन फुटली, तर रस्त्यावर मलमूत्र पसरून घाणीसोबत आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तरीही याचे भान हे काम करणाऱ्या कंत्राटदारांना नाही. शिवाय पालिका प्रशासन किंवा येथील पदाधिकारी, सदस्यही याबाबत काहीच बोलत नाहीत. त्यामुळे या कामाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा : खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण

आकारही कमीच…

संपूर्ण शहरातील मलमूत्र वाहून नेणाऱ्या या भूमिगत मलनि:सारण योजनेच्या पाइपचा आकार व दर्जाही जेमतेम आहे. अगदी अर्धा फुटहून कमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे मलमूत्र त्यातून कसे वाहणार, हे कळायला मार्ग नाही. शिवाय ही अरुंद पाइपलाइन तुंबली तर शहरात निर्माण होणाऱ्या भयंकर समस्यांची कल्पनाच न केलेली बरी, अशी स्थिती आहे.

(संपादन ः दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads deteriorated in the work of drainage scheme at gadchiroli