सावधान! तुम्हीही दामदुपटीच्या प्रलोभनाला बळी पडता का? लुबाडणारी आंतरराज्यीय टोळी गवसली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

उत्तर प्रदेशातील कुलदीप शर्मा याने चंद्रपुरातील एका व्यक्तीला फोन करून कंपनीत पैसे गुंतवून दामदुपट करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार तक्रारदाराने 2014 ते 5 जानेवारी 2020 पर्यंत बॅंक खात्यात टप्याटप्याने 47 लाख 14 हजार 300 रुपये जमा केले. यानंतर संशय आल्याने रामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

चंद्रपूर : दामदुपटीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातून अटक करण्यात चंद्रपूर सायबर पोलिसांना यश आले. या आरोपींकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देशात ठिकठिकाणाहून या टोळीने सुमारे एक कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

असी आहेत आरोपींची नावे

कुलदीप ऊर्फ राजकुमार वालिया ऊर्फ मल्होत्रा बनवारीलाल शर्मा (वय 28, रा. उपाध्याय मोहल्ला, खैर जि. अलिगड, उत्तरप्रदेश), दीपसिंग ऊर्फ दीपू ऊर्फ ओबेरॉय मनवीरसिंग (वय 30, रा. अलीपूर गिजौरी, बुलंदशहर, उत्तरप्रदेश), उसवन ऊर्फ अभय ऊर्फ रमन भोपालसिंग (वय 33, रा. शास्त्रीनगर, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एक महिन्यापासून आरोपींचा शोध

सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, प्रशांत, भास्कर, राहुल, इम्रान यांच्या पथकाने तपास सुरू केला. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मेरठ, अलिगड, बुलंदशहर (उत्तरप्रदेश) आणि गुडगाव (हरियाणा) येथे मागील एक महिन्यांपासून आरोपींचा शोध सुरू केला.

तिघांना पोलिस कोठडी

चंद्रपूर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथून कुलदीप ऊर्फ राजकुमार वालिया ऊर्फ मल्होत्रा बनवारीलाल शर्मा, दीपसिंग ऊर्फ ओबेरॉय मनवीरसिंग, उसवन ऊर्फ रमन भोपालसिंग या तिघांना अटक केली. या तिघांना 19 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

या आरोपींविरुद्ध विविध राज्यात गुन्हे दाखल असून, आतापर्यंत त्यांनी देशात ठिकठिकाणाहून सुमारे एक कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या आरोपीकडून मोबाईल, सीमकार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, विविध बॅंकांचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड तसेच दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा की : ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन्‌...

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, मुजावर अली, संतोष पानघाटे, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, इमरान शेख, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, उमेश रोडे, वैभव पत्तीवार, महेश चव्हाण यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The robbing interstate gang arrested at chandrapur