esakal | पुसद पंचायत समितीत दोघांच्या आत्महत्या प्रयत्नाने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ : अहवालासाठी दोघांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

यवतमाळ : अहवालासाठी दोघांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : न्यायालयीन याचिकेसाठी ग्रामपंचायत सदस्याचा शौचालय बांधणी अहवाल वेळेत न दिल्याने ग्रामसेवकाविरुद्ध बोरगडी ग्रामपंचायत मधील दोन नागरिकांनी पुसद पंचायत समितीच्या आवारात शुक्रवार (ता. १६) रोजी अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच सहाय्यक गटविकास अधिकारी धावून आले व शौचालयाचा बांधकामाचा अहवाल तातडीने देण्याचे कबूल केल्यानंतर पुढील अनर्थ टळला. या प्रकाराने पुसद पंचायत समितीत खळबळ उडाली असून पंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

काही महिन्यापूर्वी बोरगडी ग्रामपंचायतची अटीतटीची निवडणूक पार पडली. यात सीमा कश्यप खडसे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या.ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी घरी शौचालय असणे बंधनकारक आहे. सीमा खडसे यांनी घरी शौचालय असल्याचे स्वयंघोषणा पत्र निवडणूक आयोगाला सादर केले. प्रत्यक्षात त्यांच्याकडे शौचालय नसल्याने बोरगडी येथील नागरिक संतोष राजाराम भालेराव यांनी सीमा खडसे या ग्रामपंचायत सदस्य विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी ग्रामसेवक एम एस डांगे यांच्याकडे सदर ग्रामपंचायत सदस्याचा शौचालय असल्याचा दाखला (ता.५) जुलै रोजी मागितला. मात्र ग्रामसेवकाने वेळेत सदर माहिती दिली नाही. उलट या कामात विलंब व्हावा म्हणून जाणीवपूर्वक गटविकास अधिकारी यांच्याकडे ।मार्गदर्शन मागितले.

आपल्याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळताच सदर महिला ग्रामपंचायत सदस्याने शुक्रवार (ता.१६) रोजी सकाळी शौचालय बांधकामास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच संतोष राजाराम भालेराव व ओमप्रकाश शिंदे यांनी दुपारी पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बैठकीला निघून गेल्याने या दोघांनी कॅन मधील डिझेल अंगावर ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा होताच प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी गवई घटनास्थळी धावून आले. त्यांनी इन कॅमेरा एक तासाच्या आत शौचालय बांधकामाचा स्पाट पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. प्रशासकीय कामात होणाऱ्या दिरंगाई विरुद्ध करण्यात आलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे पुसद पंचायत समितीचे वातावरण ढवळून निघाले. वृत्त लिहीपर्यंत पंचनामा मिळाला नसल्याचे ओमप्रकाश शिंदे यांनी सांगितले.

पंचायत प्रशासनावर कुणाचाही वचक नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी विनाकारण बदनाम होत आहे. प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराबद्दल आमची तक्रार आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. पुसद पंचायत समितीला पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नेमावा.

- ओमप्रकाश शिंदे,बोरगडी ग्रामपंचायत

loading image