आकांक्षांपुढती गगन ठेंगणे,धामणगावची रूपाली आता तहसीलदार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

रूपालीला आजपर्यंत नोकरीच्या सहा संधी आल्या, पण तिला वर्ग एकची अधिकारी व्हायचे होते, अखेर तहसीलदार या पदावर रूपालीने बाजी मारली.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : हम भी किसीसे कम नही, असे सांगत शेंदूरजनाखुर्द येथील जिल्हा परिषद व एकता विद्यालयात शिक्षण घेतलेल्या रूपाली देविदास मोगरकर या विद्यार्थिनीने चक्क तीन स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास रचला होता. आणि तोही महिला दिनी. सध्या रिसोड येथे महिला व बालविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रूपाली मोगरकर यांनी शुक्रवारी (ता. 19) जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करीत तहसीलदार पदावर बाजी मारली आहे.

यापूर्वी जलसंपदा विभागात कार्यरत असलेल्या रूपाली मोगरकरने एमपीएसपीतर्फे घेतलेल्या एक्‍साईज विभागाच्या एसआय पदासाठी मुलींमधून राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला होता. इतकेच नव्हे तर एमपीएससीच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेतही तिने यश प्राप्त केले. नगरपरिषदेतही कर अधिकारी या पदासाठी ती पात्र ठरली आहे. महिला व बालविकास अधिकारी पदासाठी रूपाली मुलींमधून राज्यातून पहिली आली होती.

पाटबंधारे विभागात तृतीय श्रेणी कर्मचारी असलेले रूपालीचे वडील देविदास हे शेंदूरजना येथे कार्यरत होते. त्यामुळे रूपालीचे प्राथमिक शिक्षण शेंदूरजनाखुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले. बारावीनंतर डीएड करून स्पर्धापरीक्षेचा अभ्यास व पदवीचे शिक्षण सोबतच सुरू ठेवले. 2013 मध्ये ती जलसंपदा विभागात अनुरेखक पदावर रुजू झाली.

रूपालीला आजपर्यंत नोकरीच्या सहा संधी आल्या, पण तिला वर्ग एकची अधिकारी व्हायचे होते, अखेर तहसीलदार या पदावर रूपालीने बाजी मारली. रूपालीची आई कुसूम गृहिणी असून तिचा लहान भाऊ अक्षय मोगरकर हा वापी येथे पॉवर ग्रीडमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. मोठा भाऊ रितेश हा अमरावती येथे स्वतःचा व्यवसाय करतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या रूपालीचे अभिनंदन होत असताना ती मात्र आपले यश आईवडील, शिक्षक, मित्र व आपल्या मेहनतीला समर्पित करीत आहे.

सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट

420 जणांची अधिकारीपदी निवड
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारला (ता.19) जाहीर करण्यात आला. त्यात 420 जणांची अधिकारी म्हणून निवड झाली. यामध्ये शेंदूरजनाखुर्द येथील रूपाली मोगरकर यांनी तहसीलदार या पदावर बाजी मारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali from Dhamangao is now Tahasildar