दुःखद! 900 गणेश मंडपांमध्ये अनधिकृत वीज!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

नागपूर : उपराजधानीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अधिकृत यादी अकराशेहून अधिकची असली तरी अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांची संख्या दोनशेच्या घरातच पोहोचू शकली आहे. उर्वरित सार्वजनिक गणेश मंडपांमधील रोषणाई अनधिकृत असल्याचे वास्तव आहे.

नागपूर : उपराजधानीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अधिकृत यादी अकराशेहून अधिकची असली तरी अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांची संख्या दोनशेच्या घरातच पोहोचू शकली आहे. उर्वरित सार्वजनिक गणेश मंडपांमधील रोषणाई अनधिकृत असल्याचे वास्तव आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, या दृष्टीने सर्वधर्मीय सार्वजनिक उत्सवांप्रमाणेच गणेशोत्सवासाठी वीजवितरण कंपन्यांकडून मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येतो. यंदासुद्धा मंडळांनी अधिकृत वीजजोडणीच घेण्याचा आग्रह एसएनडीएल व महावितरणने केला होता. परंतु, मंडळांनी या आव्हानाला पाठ दाखविल्याचे चित्र आहे. शहराच्या मोठ्या भागात वीजपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या एसएनडीएलकडे दरवर्षी वीजजोडणीसाठी साधारणत: दोनशे मंडळांचे अर्ज येतात. यंदा मात्र 69 अर्जच प्राप्त झाले असून 54 मंडळांना वीजपुरवठा देण्यात आला आहे. अधिकृत वीजजोडणी घेणाऱ्यांची ही संख्या फारच तोकडी आहे. त्या तुलनेत महावितरणकडे करण्यात आलेल्या अर्जांची संख्या जास्त आहे. शहर मंडळात 70 हून अधिक मंडळांना तर ग्रामीण भागात 25 हून अधिक मंडळांना अधिकृत वीजपुरवठा देण्यात आला आहे.
अनधिकृत वीजजोडणी टाळणाऱ्या मंडळांकडून एकतर शेजारून किंवा थेट वाहिनीवर हूक टाकून वीज घेतली जाते. हे दोन्ही प्रकार धोकादायक ठरतात. सार्वजनिक गणेशाच्या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. अशात धोका अधिकच वाढतो. यामुळेच महावितरण आणि एसएनडीएलने अधिकृत वीजजोडणीचा आग्रह धरीत अनधिकृत वीजजोडणी घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. पण, ही कारवाई खरंच होणार का, हा कळीचा मुद्दा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sad! Unauthorized electricity in 900 Ganesh tents!