साहित्य संमेलनात "उमेदवारां'ची वर्णी !

नितीन नायगांवकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध सत्रांमध्ये सामावून घेत संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील स्पर्धेत राहिलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या पलीकडे संबंधित साहित्यिकांचे महत्त्व जपण्याचा एक उत्तम पायंडाही यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व यजमान संस्थेने घालून दिला आहे.

नागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध सत्रांमध्ये सामावून घेत संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील स्पर्धेत राहिलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या पलीकडे संबंधित साहित्यिकांचे महत्त्व जपण्याचा एक उत्तम पायंडाही यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व यजमान संस्थेने घालून दिला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक तशी कायम चर्चेचाच विषय राहिली आहे. मात्र, यावर्षीपासून निवडणुकीऐवजी निवड ही पद्धत लागू करण्यात आल्याने एकूणच "हेल्दी' वातावरण होते. 2014 मध्ये सासवडला झालेल्या साहित्य संमेलनासाठी विदर्भाच्या डॉ. प्रभा गणोरकर संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत उमेदवार होत्या. विदर्भ साहित्य संघाने आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यावेळी प्रभा गणोरकर यांना पराभव स्वीकारावा लागला आणि फ. मु. शिंदे संमेलनाध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर यंदाच्या निवड पद्धतीत विदर्भ साहित्य संघातर्फे जी नावे सूचविण्यात आली होती, त्यातही प्रभा गणोरकर यांचे नाव होते. डॉ. अरुणा ढेरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या नावाला पसंती होती. अरुणा ढेरे यांना सर्वाधिक बारा मते पडली. प्रभा गणोरकर यांच्या योगदानाची दखल साहित्य क्षेत्राने घेतलेली आहे. यापूर्वीच्या अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभागही राहिलेला आहे. पण, त्यांची प्रकट मुलाखत साहित्य संमेलनात ठेवणे, ही बाब त्यांना आणि विदर्भ साहित्य संघालाही दिलासा देणारी आहे. याशिवाय डोंबिवलीच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांचा आयोजकांनी मान्यवरांच्या कवितावाचनाच्या सत्रात समावेश केला आहे. या दोन्ही मंडळींच्या योगदानाची अशा पद्धतीने घेण्यात आलेली दखल कौतुकास्पद ठरावी.
उमेदवार नव्हते तरीही...
गेल्या वर्षी बडोद्याच्या साहित्य संमेलनासाठी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. पण, "अध्यक्षपद सन्मानाने बहाल केले तरच स्वीकारणार, निवडणूक लढणार नाही', असे स्पष्ट केले होते. निवडणूक झाल्यामुळे न्या. चपळगावकर यांचे नाव मागे पडले. पण, त्यांची प्रकट मुलाखत बडोद्याच्या संमेलनात आयोजित करण्यात आली होती, हे विशेष.  

 

 

Web Title: sahitya sammelan news