महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न ; तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

प्रकाश दुर्गे
सोमवार, 19 जून 2017

मुलचेरा तालुक्यातील कंचनपूर येथे काल रात्री एका महिलेसोबत दुष्कृत्य करण्याच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव घेतल्याची घटना घडली. त्यामध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.

मुलचेरा : तालुक्यातील कंचनपूर येथे काल रात्री एका महिलेसोबत दुष्कृत्य करण्याच्या प्रयत्नातून अवघ्या तीन वर्षांच्या बाळाचा जीव घेतल्याची घटना घडली. त्यामध्ये बाळाची आई सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.

कांचनपूर येथील पीडित महिलेचा पती काही दिवस काम करण्यासाठी हैदराबाद येथे गेल्याने घरी त्याची पत्नी व लहान बाळ एकटेच असल्याचा बघून घरासमोमरच असलेल्या संजू विश्वनाथ सरकार (वय अंदाजे 20 वर्षे) याने त्या महिलेसोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला व महिलेने नकार देऊन आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच बाळाला व महिलेला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बाळाचा जीव गेला व महिला गंभीर जखमी झाली.

सकाळी उठल्यानंतर घरचे सदस्य कोणीही बाहेर न आल्याने आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यानंतर घरात प्रवेश करताच दोघेही बेशुद्ध स्थितीत दिसून आले. त्या महिलेला पाणी पाजताच शुद्धीवर येऊन सदर घटनेची माहिती देऊन आरोपीचे नावही सांगितले. मात्र तोपर्यंत आरोपी जंगलात फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
महिलेला अहेरी येथील रुग्णालयात दाखल केले असून, या घटनेची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे स्वतः करीत आहेत. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर त्या महिलेकडून घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Sakal news gadchiroli news breaking news

टॅग्स