वृद्ध दाम्पत्याच्या इच्छाशक्तीला सलाम

मनोज भिवगडे 
Monday, 4 May 2020

वय वर्ष 94 ...घरी बसून आरामात दिवस काढण्याचं वय...पण या वयातही समाजाचे ऋण फेडण्याची कमालीची इच्छाशक्ती...साथ मिळाली ती 88 वर्षांच्या पत्नी... अन् तरूणांना लाजवेल अशी किमया करीत या जोडप्याने चक्क 500 मास्क तयार केले

अकोला : वय वर्ष 94 ...घरी बसून आरामात दिवस काढण्याचं वय...पण या वयातही समाजाचे ऋण फेडण्याची कमालीची इच्छाशक्ती...साथ मिळाली ती 88 वर्षांच्या पत्नी... अन् तरूणांना लाजवेल अशी किमया करीत या जोडप्याने चक्क 500 मास्क तयार केले...अन् कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी लोकांना ते विनामूल्य वितरितकही केले. या महादेव भगत (94) व सौ. कलावती भगत (88) यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीला सलाम.

 

आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकाटाशी लढा देत आहे. प्रत्येक जण आपआपल्या परीने या संकाटात सापडलेल्यांची मदत करताना दिसत आहे. कुठे अन्नदानाच्या रूपाने तर प्रत्यक्ष कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा करणारे योद्धा दिसून येत हेत. शासकीय यंत्रणा, पोलिसही या लढ्यात उतरले आहेत. त्यांचे प्रोत्साहन वाढविणारे हातही कमी नाहीत. तरूण, तरूणींपासून झारेच हा लढा लढत आहेत. त्यांच्यासोबतच वयाच्या 94 व्या वर्षी महादेवराव व त्यांची 88 वर्षी पत्नीही जिद्दीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. ज्या वयात स्वतःलाच दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते, अशा वयातही महादेवराव आणि कलावती ज्यांची जिद्द खरोखरच सन्मानास पात्र आहे.

 

विनामूल वितरण
वयाच्या शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या वृद्ध दाम्पत्याने आतापर्यंत 500 मास्क तयार केले आहेत. ते त्यांनी लोकांना विनामूल्य वितरित केले. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता एखाद्या संस्थेच्या माध्यमातून कमी वेळेत अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल, या उद्देशाने त्यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीशी संपर्क साधला. रेडक्रॉसचे कार्यकारी सदस्य राजू बुडकुले व मानद व्यवस्थापक मोहन काजळे यांच्याकडे या दाम्पत्याने दोनशे मास्क रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून वितरणासाठी सोपविले.

 

अशी सूचली कल्पना
केला प्लॉटमधील शेजारी राहणाऱ्या गुजराती परिवाराने भगत कुटुंबीयाला लावण्यासाठी तीन मास्क आणून दिले. मूळ पाथर्डीचे (ता.तेल्हारा) असलेल्या सौ. कलावती यांनी पतीला तसे मास्क वितरणासाठी तयार करण्याचे सूचविले. आधीच्या काळात शिवणकामासोबतच शेती, गायन, हार्मोनियम वादन आधी छंद जोपासणारे महादेवराव यांनी स्वखर्चाने कापड इत्यादी आणून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे सेवानिवृत्त पुत्र प्रभुदास भगत त्यांना या कार्यात सहकार्य करीत आहे.

 

रेडक्रॉसने केला तिघांचाही सन्मान
वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या सेवानिवृत्त मुलाच्या जिद्दीला सलाम करीत रेडक्रॉस सोसायटीतर्फे त्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वृद्ध दाम्पत्याने तयार केलेले मास्क गरज असलेल्यांना वितरित करण्यात येईल, असे रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंह बछेर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salute the will of the elderly couple in Akola city