चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी आढळले पाच कोरोनाबाधित रुग्ण...आरोग्य यंत्रणा सतर्क

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोना संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या विदर्भाचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली आहे. एकट्या चंद्रपूर शहरात शनिवारी एकूण पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. हे सर्व जिल्ह्यातील विविध भागातील गावातील रहिवासी आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी आणखी 5 बाधितांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 118 झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 57 आहे; तर सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 61 आहे.

 

शनिवारी दुपारी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक 47 वर्षीय महिला व 19 वर्षीय युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगणा राज्यातून हे दोन्ही कुटुंबांचे सदस्य परत आले होते. 26 जूनपासून ते गृहविलगीकरणात होते.

 

काल घेण्यात आलेला त्यांचा स्वॅब शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. ऊर्जानगरमधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधिताच्या संपर्कातील 47 वर्षीय महिलादेखील आज पॉझिटिव्ह म्हणून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, नाशिक येथून हे कुटुंब परत आले होते.

एकूण पॉझिटिव्ह संख्या 118

हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील 30 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे शहरातून 24 जूनला ते चंद्रपूरमध्ये आले होते. तेव्हापासून संस्थात्मक विलगीकरणातच होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह निघाला आहे. गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील 48 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. आसाम राज्यातून 29 जून रोजी परतल्यानंतर ती व्यक्ती गृहविलगीकरणात होती. त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह संख्या 118 झाली आहे.

जाणून घ्या : सर्वसामान्य कोरोनासह जगण्याची कला हळूहळू अवगत करीत आहेत, वाचा हा रिपोर्ट...

संस्थात्मक विलगीकरणात होते

शुक्रवारी रात्री चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, ऊर्जानगर आणि गोंडपिंपरी तालुक्‍यातील करंजी येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला आहे. ऊर्जानगरातून 53 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. नाशिक येथून आल्यानंतर तो संस्थात्मक विलगीकरणात होता. बाबूपेठ परिसरातील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या 20 वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. विदेशातून आलेला हा युवक संस्थात्मक विलगीकरणात होता. तिसरा रुग्ण हा गोंडपिंपरी तालुक्‍यातील करंजी गावाचा आहे. तेलंगणातून हा युवक परत आल्यानंतर गृहविलगीकरणात ठेवण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the same day in Chandrapur district