यवतमाळकरांची चिंता वाढली! मोराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोबंड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने

चेतन देशमुख
Sunday, 24 January 2021

दोन्ही नमुन्यांचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. दोन्ही ठिकाणचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सावरगड येथील कोंबड्या तसेच उजोना येथील पक्षाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सुरक्षितता म्हणून दहा किलोमीटरचा परिसर अ‍लर्ट झोन म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मरण पावलेल्या पक्षांचा एच १, एन १ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यातही वाढता आहे. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. याठिकाणचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, आर्णी तालुक्यातील मोरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमधील जवळपास साडेतीन हजार कोबंड्याचा मृत्यू झाला होता. याठिकाणचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. यासोबत दारव्हा तालुक्यातील उजोना येथे पक्षी मृत आढळले होते. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

जाणून घ्या - विदर्भाचे मोठे नुकसान; तायवानने १० हजार कोटींचा प्रकल्प गुंडाळला, येणारा रोजगारही गेला

दोन्ही नमुन्यांचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. दोन्ही ठिकाणचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आर्णी, दारव्हा व यवतमाळ तालुक्यातील नमुने पॉझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. प्रशासनस्तरावरुन उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sample positive at Ujona in Darwha taluka Yavatmal bird flue news