प्रशासनाने आवळल्या वाळूमाफियांच्या मुसक्‍या; मात्र सिहोरा परिसरात वाळूची साठवणूक सुरूच

file photo
file photo

सिहोरा (जि. भंडारा) : सिहोरा परिसरात नदीकाठावर वाळूची चोरटी वाहतूक आणि साठवणूक सुरू असली; तरी खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे. या परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सतत फेरफटका मारत असल्याने वाळूमाफियात दहशत निर्माण झाली आहे. मात्र, अवैध साठवणूक केल्याने वाळूच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाला काही प्रमाणात माफियाच्या मुसक्‍या आवळण्यात यश मिळाले आहे.

सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या काठांवर अनेक ठिकाणी वाळूचे अनधिकृत साठे करण्यात आले आहेत. येथे राजरोसपणे वाळूउपसा करण्याचा प्रकार सुरूच आहे. वाळूमाफिया आणि गावातील काही कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे वाळूची चोरटी वाहतूक आणि साठवणुकीचा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत आहे. वाळूची अवैध साठवणूक सुरू असताना त्याविरोधात बेधडक कारवाई होत नाही.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा

देवरीदेव, वारपिंडकेपार, घानोड गावांच्या शिवारात वाळूचे अनधिकृत साठे निर्माण झाले आहेत. सीतेपार शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून मातब्बर राजकीय कार्यकर्ता दरवर्षी वाळूची अवैध साठवणूक करतो. त्याला पोलिस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. देवरीदेव आणि वरपिंडकेपार परिसरात अवैध वाळूसाठ्यांच्या विरोधात धाडसी कारवाई झाली नाही. अशा साठ्यातील वाळूविक्री रात्रीच केली जाते. याची प्रशासकीय यंत्रणेला माहिती आहे. कवलेवाडा धरण मार्गावरून वाळूचे ट्रक रवाना करण्यात येतात. या परिसरात दिवसभर शांत दिसणारे वातावरण रात्री वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे गजबजून जाते.

तुमसर-बपेरा राज्यमार्गावर वाहतुकीत वाढ

नाकडोंगरी मार्ग बंद असल्याने तुमसर-बपेरा राज्यमार्गावर वाहतुकीत वाढ झाली आहे. दोन पदरी मार्गावरून चार पदरी वाहतूक सुरू झाली आहे. मध्य प्रदेशमधून वाळूची आयात होत आहे. रॉयल्टी पास असताना ओव्हरलोड ट्रकमधून बपेरा आंतरराज्य सीमेवरून वाळू आणताना उपप्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यामुळे राज्यमार्गावर त्यांची धावपळ सुरू झाली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतुकदार व माफियांत दहशत निर्माण झाली आहे. एकाने तर, सध्या वाळू खरेदीदार नसल्याने हा व्यवसाय चौपट झाला, असे सांगितले आहे. नागपूरला वाळूचे दर बसल्याने व्यावसायिकांनी डोक्‍यावर हात ठेवले आहेत. उपप्रादेशिक विभाग आणि महसूल विभागाने या वाळू माफियांच्या मुसक्‍या आवळल्या असल्याचे परिसरात दिसून येत आहे.


वाळूमाफियांचे साम्राज्य

नागपूर व कामठीच्या वाळूमाफियांनी पांजरा शिवारात नदीकाठावर वाळूचा भलामोठा डोंगर उभारला होता. जवळच त्यांनी राजरोसपणे लिलाव झालेल्या घाटाप्रमाणे मोठा शामियाना उभारला होता. यावरून परिसरात वाळूमाफियांचे साम्राज्य निर्माण झाले होते. परंतु, प्रशासनाने या घाटावरील अवैध साठवणुकीच्या विरोधात कारवाई केली. पोलिस आणि महसूल विभागाच्या नियंत्रणात कारवाई केल्याने माफियांच्या धाबे दणाणले. परंतु, त्यांना सहकार्य करीत असलेले काही स्थानिक कार्यकर्त्यांनी अन्य ठिकाणी वाळू साठवणूक सुरू केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com