रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?

रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?

मोहाडी (जि. भंडारा) : गावाजवळून वाहणारी नदी गाववासीयांसाठी समृद्धी आणते. तिच्यातून मिळणाऱ्या अमृताने कितीतरी जीवांना जीवदान मिळते. अशीच समृद्धी मोहाडी तालुक्याच्या काठावरून वाहणाऱ्या वैगगंगेने आणली. नदीच्या विस्तीर्ण काठावर बारीक वाळू निपजली. जमीन पाणी शोषून राहात असल्याने भूजलस्तरही वाढला. परंतु, रेतीमाफियांची वाईट नजर गेली आणि नदीपात्राची ऐशीतैशी झाली. स्वार्थ रेती माफियांमुळे नदीपात्रात खोल डोह पडले, ज्यात अनेकांचे जीवही गेले. रेती म्हणजे कुबेराचा खजिना, असेच समजून रेतीचोरीचा गंदा धंदा रात्रीच चालतो. त्यावर राबणाऱ्या मजूर, वाहनचालकांना अतिशय अल्प मोबदला देऊन हे जिकरीचे काम त्यांच्याकडून करवून घेतले जाते.

हाताला काम नसल्याने हा जीवघेणा सौदा ते रोज करतात. या धंद्यावर गब्बर मात्र दुसरेच होतात. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सार खेळ सुरू असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असाच हा मामला आहे. या प्रकाराने स्थानिक त्रस्त आहेत. रात्रभर सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. जड वाहतुकीमुळे रस्ते रस्ते राहिलेले नाहीत. वाहनांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी भयंकर स्थिती असताना कुणी दखल कशी घेत नाही, हा प्रश्न मनाला अस्वस्थ करणारा आहे.

मोहाडी तालुक्‍यात १०८ गावे आहेत. वैनगंगा व सूर तालुक्यातील दोन मुख्य नद्या आहेत. विदर्भातील सर्वात चांगली रेती मोहाडी तालुक्‍यात मिळते. त्यामुळे तस्करांची नजर याच रेतीघाटावर असते. येथील रेती महाराष्ट्रात सर्वाधिक महागडी विकली जाते. मोठ्या मोठ्या टिप्परने वाळू शहरापर्यंत नेली जाते. यात रेती तस्करांसोबतच प्रशासनाचेही तेवढेच सहकार्य असते. गावागावातील बेरोजगार युवकांनी बँकांचे कर्ज काढून ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी घेतले. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी हिंमत करून रेती तस्करीचा धंदा सुरू केला ते आज मालामाल झाले. पण आता दोन वर्षांपूर्वी ज्यांनी वाहन घेऊन मालामाल बनण्याचा प्रयत्न केला ते कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. नदीत रेती नाही वरून रेती चोरी करताना सापडले तर भरावी लागणारी दंडाची रक्कम यामुळे आर्थिक कंबरडे मोडते. पावसाळ्यात नदीला पाणी व चिखलामुळे रेती काढणे शक्य होत नाही. त्यामुळे बॅंकांचे हप्ते कसे भरावे, हा प्रश्न पडतो. रेती तस्करी बंद तर मजुरांची मजुरी बंद. त्यामुळे मजुरांचाही जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.

रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

नाममात्र मजुरी, पण करण्याशिवाय गत्यंतर नाही

रेती व्यवसायात मजुरांना खूप मजुरी मिळते असे नाही. एक ट्रॅक्टर रेती भरण्याचे जवळपास दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. त्यात कितीही मजूर असू शकतात. त्यांना ट्रॉलीप्रमाणेच पैसे मिळणार. दिवसा चोरीची रेती काढणे कठीण असते. महसूल विभागाच्या लक्षात आले तर दंड भरावा लागेल या भीतीने रात्रीच रेती काढली जाते. सर्व जग झोपी गेल्यानंतर त्यांचा खेळ सुरू होतो. रात्रभर १० ट्रॅक्टर रेती काढली तरी जास्तीत जास्त दोन हजार रुपये मिळतात. त्यानंतर असणारे पाच ते सहा जण वाटून घेणार. प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये येणार. परंतु रात्री जीव धोक्यात घालून हे सर्व मजुरांना करावे लागते. नियमित काम मिळाले तर ठीक अन्यथा त्यांना मजुरी परवडणारी नाही. परंतु कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी दुसरे कुठलेही साधन त्यांना नाही.

पाच वर्षांपासून घाटांचा लिलाव नाही

तालुक्यात १६ घाट आहेत. त्यात बेटाळा दक्षिण, बेटाळा उत्तर, रोहा, मुंढरी बु., कान्हडगाव, ढिवरवाडा, नीलज खुर्द, नीलज बु., मोहगाव(देवी), बोथली, पांजरा, टाकळी, नेरी, पाचगाव १, पाचगाव २, खमारी बु. या घाटांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून घाट लिलावच झालेला नाही. यंदा तीन वर्षांकरिता घाट लिलाव झाला तर त्यात चार घाटांना रेती व्यवसायिकांनी प्राधान्य दिले. यात बेटाळा उत्तर, मोहगाव (देवी), नीलज बु., कान्हडगाव हे घाट लिलाव १० कोटी ९४ लाख ८२ हजार ६८३ रुपयांत करण्यात आले. मोहाडी पोलिसांनी २०१८ ते २०२१ या काळात ५५ टिप्पर, ४ जेसीबी, २२ ट्रॅक्टरवर कारवाई करून रेती माफियांची कंबर मोडण्याच्या प्रयत्न केला.

रेतीचोरीचे काम मजुरांमार्फत केले जाते. गेल्या काही वर्षांपासून रेतीघाटांचा लिलावच झालेला नाही. गावातील बांधकामांना जी रेती लागते ती स्वस्त दरात मिळावी. घरकुलांना विनामूल्य दिली जावी. घरकुलांना विनामूल्य रेती मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रशासनाची बाजू समजून नियमानुसार गरजूंना रेती कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु त्यासोबतच इतर बांधकामांना स्वस्त दरात रेती मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. रेतीमाफियांची माफियागिरी कुठेतरी बंद झाली पाहिजे. कायदेशीररीत्या कशी वाहतूक करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- राजू कारेमोरे, आमदार, तुमसर-मोहाडी मतदारसंघ
रात्रीस खेळ चाले : वाळू होय काय कुबेराचा खजिना?
अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग
जे घाट लिलाव झाले त्या घाटातून रेतीची उचल न करता अनधिकृतरीत्या मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. वाळूचोरीची रोजगार हमीसारखी अवस्था झालेली आहे. ‘तुम्ही चोरी करा आम्हाला अर्धे द्या आणि अर्धे तुम्ही कमवा’ इतकी वाईट स्थिती आहे. सरकार कुणाचेही असो रेतीचे माफियाराज कदापि बंदहोऊ शकणार नाही. जोपर्यंत सरकारचे नियम बदलत नाही, सरकारी दराप्रमाणे लोकांना रेती उपलब्ध होत नाही तोपर्यंत हा माफिया राज बंद होऊ शकणार नाही. रेतीचोरीच्या भ्रष्टाचाराला आळा घातला तर आणि तरच यावर अवलंबून असणाऱ्यांना सुखा-समाधानाचे जीवन मिळेल.
- चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर-मोहाडी मतदारसंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com