संजय मांजरेकर म्हणतात, क्रिकेटच्या मैदानावर नेहमी विनम्र राहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर  : क्रिकेटमध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल, तर कठोर परिश्रमासोबतच खेळाडूमध्ये शिस्त, समर्पणवृत्ती आणि विनम्रता हे गुण आवश्‍यक आहेत. हे गुण ज्या खेळाडूमध्ये असतात, तोच शिखर गाठू शकतो, असे प्रतिपादन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी केले. मांजरेकर यांनी वैदर्भी खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास ठेवून, यशासाठी कधीही "शॉर्टकट' न वापरण्याचा सल्ला दिला.

नागपूर  : क्रिकेटमध्ये यशाचे शिखर गाठायचे असेल, तर कठोर परिश्रमासोबतच खेळाडूमध्ये शिस्त, समर्पणवृत्ती आणि विनम्रता हे गुण आवश्‍यक आहेत. हे गुण ज्या खेळाडूमध्ये असतात, तोच शिखर गाठू शकतो, असे प्रतिपादन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी केले. मांजरेकर यांनी वैदर्भी खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास ठेवून, यशासाठी कधीही "शॉर्टकट' न वापरण्याचा सल्ला दिला.
विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे (व्हीसीए) आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांजरेकर म्हणाले की, कठोर परिश्रमासोबतच खेळाडूमध्ये शिस्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक खेळाडू याच गुणामुळेच यशस्वी ठरले आहेत. खेळात यश आणि अपयश येतच असते. त्यामुळे हताश न होता सदैव मेहनत करीत राहणे आवश्‍यक आहे. खेळाडूचा स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास असेल, तर त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. खेळाडूंना नम्र राहण्याचा सल्ला देत मांजरेकर यांनी सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले. सचिन क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत जमिनीवर राहिला आणि आजही तो तितकाच नम्र आहे. त्याचा हा गुण युवा पिढीतील क्रिकेटपटूंनी आत्मसात करण्याची गरज आहे. व्हीसीएने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये विविध वयोगटांत मिळविलेल्या ऐतिहासिक उपलब्धींची स्तुती करीत मांजरेकर म्हणाले की, विदर्भ क्रिकेट संघांनी मिळविलेले यश खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. यश मिळविणे अतिशय सोपे असते. ते टिकवून ठेवणे तितकेच कठीण असते. येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भाच्या क्रिकेटपटूंपुढे हे अवघड आव्हान राहणार आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात विदर्भ हे आव्हान यशस्वीरीत्या पेलेल, अशी आशा त्यांनी आहे.
व्हीसीएचे अध्यक्ष ऍड. आनंद जैस्वाल यांनी आपल्या भाषणात मागील तीन वर्षे विदर्भ क्रिकेटसाठी अविस्मरणीय राहिल्याचे सांगून, खेळाडूंच्या मेहनतीमुळेच व्हीसीएला हा दिवस बघायला मिळाला, असे सांगितले. उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनीही वैदर्भी क्रिकेटपटूंच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर आनंद व्यक्‍त केला. मान्यवरांच्या हस्ते व्हीसीए तसेच बीसीसीआयतर्फे आयोजित विविध स्पर्धांमधील विजेते, उपविजेते संघ तसेच खेळाडूंचा ट्रॉफी व रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बेस्ट ग्राउंड्‌समन गंगाधर बावनकुळे व प्रशांत निंबाळकर यांनाही सन्मानित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Manjrekar says, always be courteous on the cricket field