निलंबित सरपंचाने क्रीडा साहित्य दडविले ; ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

ग्रामपंचायत सचिवाच्या माध्यामातून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले. त्यावर साहित्य ग्रामपंचायतीला आवंटित केल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातून मिळाली.

पारशिवनी, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील आमगाव बाबूळवाडा येथील निलंबित सरपंचाने गावाला मिळालेले क्रीडा साहित्य दडवून ठेवल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे त्यांनी पत्रपरिषदेतून दिले आहेत. 

ग्रामपंचायत सदस्य हितेश्‍वर चौले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, गावांमध्ये खेळ व खेळाडूंचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रकारच्या क्रीडा साहित्याचा पुरवठा जिल्हा वार्षिक योजनेमार्फत क्रीडा विकास योजनेतून केला जातो. यानुसार आमगाव बाबूळवाडा ग्रामपंचायतीला तीन लाख रुपयांचे क्रीडा साहित्य मंजूर झाले होते. हे सर्व साहित्य आमगाव बाबूळवाडाचे माजी सरपंचाने 2018 मध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातून उचलले. मात्र, ते ग्रामपंचायतीला मिळाले नाही. 

याप्रकरणाची चौकशी ग्रामपंचायत सदस्यांनी चौकशी केली. यासाठी ग्रामपंचायत सचिवाच्या माध्यामातून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले. त्यावर साहित्य ग्रामपंचायतीला आवंटित केल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातून मिळाली. मग हे साहित्य कुठे गेले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना माजी संरपंचांनी या क्रीडा साहित्याची उचल केल्याचे समोर आले. यामुळे क्रीडा साहित्य दडवून ठेवणाऱ्या माजी सरपंच अनिल बावनकुळे यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना तक्रार केल्याची माहिती हितेश्‍वर चौले यांनी दिली. यावेळी अनिकेत शिवनकर, पिंटू दुनेदार, महेंद्र डायरे, प्रफुल्ल झुरे, आशीष सहारे, एकनाथ काळे, दिगांबर ढोरे, रवी ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

37 प्रकारचे क्रीडा साहित्य 
उचल केलेल्या साहित्यामध्ये 37 प्रकारच्या खेळाशी संबंधित वस्तू होत्या. हे सर्व साहित्य ग्रामपंचायतीला हस्तांतरित करणे किंवा त्याचे वाटप करणे गरजेचे होते. मात्र, ते ग्रामपंचायतीला न देता माजी सरपंचाने आपल्याच घरी ठेवले. यात फुटबॉल, हॉकी व इतर साहित्यांचा समावेश आहे. 

माजी सरपंचावर निलंबनाची कारवाई 
क्रीडा साहित्य दडवून ठेवणाऱ्या सरपंचांना दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी मानून पदावरून निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. याशिवाय ते अनेक प्रकरणात दोषी असू शकतात असाही तर्क पत्रकार परिषदेतून लावण्यात आला. 

मी सर्व साहित्य ग्रामपंचायतीला देण्यास तयार आहे. ग्रामपंचायत इमारतीत जागा नसल्याने ते साहित्य घरीच उतरविले. त्यावेळी माझ्यावर न्यायालयात खटला सुरू होता. मानसिक स्थिती बरी नसल्याने त्यावेळी त्या साहित्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. सर्व साहित्य जसेच्या तसेच आहे. साहित्याबाबत मी बीडीओंना स्पष्टीकरण दिले आहे. 
-आशीष बावनकुळे, माजी सरपंच बाबूळवाडा-आमगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarpanch kept sports materials