सत्यपाल महाराज म्हणाले, अंधश्रद्धेपासून दूर राहा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

धामणा (लिंगा) (जि. नागपूर) :  राष्ट्रसंत तुकडोजी, संतश्रेष्ठ गाडगेबाबा हे खरे महाराज होते. स्वत: अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली, परंतु आजकाल गल्लोगल्ली महाराजांचे पीक आले आहे. हे नीतिभ्रष्ट महाराज "दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती'चे तर अंधश्रद्धेचे धोरण राबवून समाज नासवत आहेत. अशा पाखंडी महाराजांचा नाद सोडा, असे प्रबोधन सत्यपाल महाराज यांनी केले. 

श्रीसाईबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्रीसाई सेवा पंचकमिटी व नागरिकांच्या सहकार्यातून गोंडखैरी वॉर्ड पाचमध्ये गुरुवार सायंकाळी सप्तखंजिरीचे जनक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराजांची सत्यवाणी जोरादार निनादली अन्‌ त्यांच्या विनोदी बाजाच्या बोचऱ्या शब्दांनी गोंडखैरी परिसरातील नागरिकांना विचारप्रवृत्त केले. 
विज्ञान युगात हल्ली समाजात महिलेच्या अंगात देवी येते, तर पुरुषांच्या अंगात देव येतो. असे पाखंडी बुआ समाजात अंधश्रद्धा पसरवून क्‍लेश निर्माण करतात. अशा पाखंडी बुवाबाजीकडे लक्ष वेधत त्यांनी तरुण, तरुणाईना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेबांच्या पुस्तकाचे वाचन करा. अंधश्रद्धेपासून दूर राहा माझे मायबाप हो! आता ध्येयावर लक्ष केंद्रित करून राजकीय पक्षांच्या दऱ्या उचलणे बंद करावे, असा सल्लाही दिला. 
सत्यपाल महाराज म्हणाले, आताची पिढी ऐदी आहे. शिक्षणाच्या नावाखाली भलतीच काम करते. मोठे झाल्यावर आई-बापाला लाथ घालते. त्यासाठी एकच सांगतो बाबू, दारू पिऊ नका, त्याने संसाराचा नाश होतो. मिळेल ते काम करायला तयार राहा. त्यामुळे कुठलेही काम करायची लाज बाळगू नका. शिक्षण घेऊन नोकरीत जाणार असाल तर लोकांचे भले करा. टेबलाखालून लाच घेऊ नका. गावातून शहरात आल्याबरोबर आईवडील तुम्हाला ओझे कसे वाटायला लागते? आयुष्याच्या संध्याकाळी या परावलंबी जीवांना जपा, वंशाला दिवाच पाहिजे म्हणून पोटातल्या कळ्या कुस्करू नका, अशा शब्दात त्यांनी बेटी बचाओचा संदेश दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyapal Maharaj said, Stay away from superstitions