सायकल वाटपात मोठा घोटाळा, एकाच दुकानातून एकाच तारखेला खरेदी

राजेश प्रायकर
Monday, 28 December 2020

शाळा मुख्याध्यापकांनी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वळती करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून तपासणी केली असता यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मुलींना सायकल वाटप करण्यात येते. सायकल लाभार्थी मुलींना दुकानातून खरेदी करायची असून, नंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. या सायकल शाळा स्तरावरून खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच दिवशी व एकाच दुकानातून खरेदी करण्यात आल्याचे समोर आले. बिलावर जीएसटी क्रमांक नसल्याने यात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. काटोल आणि रामटेकच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - बिनविरोध निवडून या 25 लाखांचा विकास निधी घ्या; आमदार धर्मरावबाबा आत्राम  यांची घोषणा 

आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ किमी अंतरापर्यंत राहणाऱ्यांना मुलींना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सायकल देण्यात येते. वर्ष २०१९-२० मध्ये रामटेक व काटोल तालुक्याला ५५.१६ लाख रुपये देण्यात आले. सायकल खरेदीसाठी ३५०० रुपये देण्यात येते. ही रक्कम डीबीटीच्या माध्यामातून थेट लाभार्थी मुलींच्या खात्यात वळती करण्यात येते. सायकल खरेदीसाठी दोन हजार आगाऊ रक्कम देण्यात येते. सायकल खरेदी व इतर कागदपत्र सादर केल्यावर १५०० हजार रुपये खात्यात जमा करण्यात येते.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण, 'पीडब्ल्यूडी...

शाळा मुख्याध्यापकांनी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वळती करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाकडून तपासणी केली असता यात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. लाभार्थ्यांच्या जोडलेल्या सायकल खरेदी पावतीवर जीएसटी क्रमांक नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे पावतीवर सायकलला फ्रेम नाही. सायकल नागपूर व तुमसर येथील एकाच दुकानातून एकाच दिवशी खरेदी करणे, कंपनीचा उल्लेख नाही, शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिकच्या दराने या खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scam in cycle distribution in nagpur