विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती दिली मात्र दुसऱ्याच्याच बँक खात्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

येथील कर्करोगग्रस्त बांधकाम कामगार सुदर्शन गोविंदराव क्षीरसागर यांची मुलगी कारंजा येथे उच्च शिक्षण घेत आहे. या मुलीसाठी दोन वर्षापूर्वी ही शिष्यवृत्ती मंजूर झाली होती.

इंझोरी (जि.वाशीम) : कामगार कल्याण मंडळाकडून गरीब पालकांच्या मुलींसाठी सहाय्यता शिष्यवृत्ती दिली जाते. येथील कर्करोगग्रस्त बांधकाम कामगार सुदर्शन क्षीरसागर यांच्या मुलीला शिष्यवृत्तीचे 20 हजार रुपये मंजूर झाले. मात्र, ही रक्कम दुसऱ्याच बॅंक खात्यावर जमा झाली. त्यामुळे ही रक्कम देण्यासाठी सदरील विद्यार्थिनी प्रशासनाकडे पायपीट करीत आहे. मात्र, ही रक्कम मिळत नसल्यामुळे हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ या विद्यार्थिनीवर आली आहे.

कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. निकषातील पात्र विद्यार्थ्यांना कामगार कल्याण मंडळाकडून शिष्यवृत्ती बॅंक खात्यावर जमा केली जाते. मात्र, येथील कर्करोगग्रस्त बांधकाम कामगार सुदर्शन गोविंदराव क्षीरसागर यांची मुलगी कारंजा येथे उच्च शिक्षण घेत आहे. या मुलीसाठी दोन वर्षापूर्वी ही शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. परंतु, या शिष्यवृत्तीची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली.

महत्त्वाची बातमी - बापरे! महिला सफाई कामगार देतेय रुग्णांना इंजेक्शन

वारंवार चकरा मारूनही पदरी निराशाच
त्यांनी हा प्रकार कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. तसेच ही शिष्यवृत्तीची रक्कम दुसऱ्याच्या बॅंक खात्यातून परत देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. परंतु, वारंवार चकरा मारूनही पदरी निराशाच पडली. त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून शिष्यवृत्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही बाब पाहता सदरील विद्यार्थिनी ही हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित आहे.

क्लिक करा - लोणार येथे पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतरही कारवाई शून्य
याबाबत सुदर्शन क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी यांनी कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, बॅंक अधिकाऱ्यांना कारवाई करून, सदरील रक्कम ज्या बॅंक खात्यात जमा झाली, तेथून काढून परत देण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतर कुठलीच कार्यवाही झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scholarships in someone else's bank account