एसडीपीओ काळे यांच्या निष्काळजीपणामुळेच जवानांचा मृत्यू

mehkar
mehkar

मेहकर (बुलडाणा) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान व खासगी गाडीचा चालक अशा 16 जणांचा जीव गेला. तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप येथील शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांची पत्नी भारती गायकवाड यांनी सकाळशी बोलताना केला आहे.

शहीद राजू गायकवाड यांच्या पत्नी भारती गायकवाड यांनी आज (ता. 5) दैनिक सकाळ शी बोलताना आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, सतत सर्चीग ऑपरेशन सुरू असते. या अभियानात दररोज 20 ते 40 किमी जवानांना जंगल फेरी करावी लागते. यावेळी बॉम्बशोधक यंत्र देखील सोबत असते, तर जेवणाचे साहित्य देखील सोबत बाळगावे लागते. एका ठेकेदाराच्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. हे ठिकाण अवघ्या 2 किमी वर होते. एरव्ही 40 किमी पायी जात असताना वाहनाने जाण्याची गरज नव्हती आणि त्यातल्या त्यात खासगी वाहन का व कशासाठी नेण्यात आले. तर अशा बाबतीत पोलिस अधीक्षक यांची रीतसर परवानगी घेऊनच जावे लागणे बंधनकारक असताना अशी वरिष्ठांची कुठलीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती, असा आरोप करीत एसडीपीओ शैलेश काळे यांनी अविचाराने काम न करता थोडी काळजी घेतली असती तर आम्हा 15 जवानांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसल्या गेले नसते.

एसडीपीओ काळे हे जवानांसोबत कधीच चांगले वागले नाहीत. प्रत्येकजण त्यांच्या लहरी स्वभावाने त्रस्त होता. 40-40 किमी चे अभियान करून आल्यानंतर किंवा 8 ते 15 दिवसानंतर जवान घरी आले की ते त्यांच्या सोबत हॉलीबॉल किंवा इतर खेळ खेळायला बोलवायचे. कुटुंब-मुलं यांना थोडा देखील वेळ ते देऊ देत नव्हते व अर्वाच्य भाषेत बोलायचे. त्यांच्या या लहरी स्वभावाचा प्रत्येकाला कंटाळा आला होता. खासगी गाडीत 16 जण आणि पाठीमागे एसडीपीओ काळे यांची गाडी मात्र ज्या वाहनात जास्त जण तेच वाहन नक्षलवादी उडविणार हे स्पष्टच होते असे सांगून अशावेळी रोड चेकिंग करणे गरजेचे असते.

वाहन देखील बुलेटप्रूफ, बॉम्ब शोधक पथक रस्ता सुरक्षित असल्याची खात्री जेव्हा देईल तेव्हाच जावे लागत असतानाही सगळी काळजी एसडीपीओ काळे यांनी न घेतल्यामुळेच 16 जणांच्या जिवावर बेतली असल्याचे सांगून एसडीपीओ काळे यांची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सांत्वनासाठी वेळ नाही
मुख्यमंत्र्यांनी यायची जी वेळ सांगितली त्यापेक्षा 3 तास ते उशिरा आले. केवळ बोबाटे व खारडे या 2 जवानांच्या कुटुंबांचीच त्यांनी भेट घेतली. इतरांची विचारपूस देखील केली नसल्याची खंत वीरपत्नी भारती गायकवाड यांनी व्यक्त केली. वास्तविक प्रत्येक कुटुंबाला बसवून सांत्वन करणे आणि आम्हाला दिलासा देणे महत्त्वाचे आहे. शासन पैसा देईल पण माझ्या मुलांना बापाचे प्रेम आता मिळेल का? वृद्ध आईवडिलांना त्यांचा राजू परत कधी दिसेल का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com