esakal | रेशन दुकानातील धान्याची परस्पर विक्री, भीमाई बचत गटाचा प्रताप
sakal

बोलून बातमी शोधा

self help group women sell ration grain illegally in mundicota of gondia

गरीब, गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा करणे सुरू केले. परंतु, खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना धान्य दिले जात नाही, हे या प्रकारावरून पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

रेशन दुकानातील धान्याची परस्पर विक्री, भीमाई बचत गटाचा प्रताप

sakal_logo
By
अतित डोंगरे

मुंडीकोटा(जि. गोंदिया): भिमाई बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना आहे. या बचतगटातील महिला सदस्यांना धान्याची परस्पर विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकार शुक्रवारी (ता.23) येथे घडला असून, तहसीलदारांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पंचनाम्यात 15 तांदळाची पोती आढळली.

गरीब, गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा पुरवठा करणे सुरू केले. परंतु, खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना धान्य दिले जात नाही, हे या प्रकारावरून पुन्हा एकदा उजेडात आले आहे. येथील भिमाई बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. या गटातील महिलांनी मात्र, धान्याची परस्पर विल्हेवाट लावली. शुक्रवारी मिनीडोअरमध्ये 15 तांदळाची पोती भरण्यात आली. हे तांदूळ परस्पर विकले जात असल्याचे समजल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबतची माहिती तिरोड्याचे पुरवठा निरीक्षक राठोड यांना भ्रमध्वनीवरून दिली. ही बाब लक्षात येताच मिनीडोअर चालक किशोर टेंभरे (रा. मेंढा) व हमालांनी तांदळाची पोती मिनीडोअरमधून परत दुकानात हलविली.

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रेशन दुकानातील स्टॉकचा पंचनामा केला. यात 15 पोती तांदूळ आढळून आले. यावेळी धान्य वाटपाची पोती अस्ताव्यस्त आढळून आले. पंचिंग मशीन व्यवस्थित चालत नसताना धान्याचे वाटप केल्याचे स्पष्ट झाले. दुकानात शिधाफलक नव्हते. या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात येणार असून, तसा अहवाल तहसीलदारांना दिला जाणार असल्याची माहिती आहे. यावेळी पुरवठा निरीक्षक जीवन राठोड, सरपंच कमलेश आथिलकर, उपसरपंच खुशाल कटरे, पोलिस पाटील महेंद्रकुमार डोंगरे, तक्रारकर्ते कमलेश पारधी उपस्थित होते. आता तहसीलदार प्रशांत घोरूडे हे भिमाई बचतगटावर कोणती कारवाई करतात? याकडे लक्ष लागून आहे.

आंबेडकर महिला बचतगटाचा डाळ घोटाळा उघड -
मुंडीकोटा येथील आंबेडकर महिला बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना आहे. या दुकानातील डाळ घोटाळादेखील गुरुवारी (ता.22) उघडकीस आला. या घोटाळ्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्याकडे संतोष साठवणे यांनी केली होती. त्यानुसार, गुरुवारी चौकशी झाली. यात कुणाला 1 किलो, 2 किलो तर कुणाला 3 किलो डाळीचे असमान वाटप करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिकाधारकांकडून वाजवीपेक्षा 15 ते 30 रुपये जास्त घेत असल्याचेही उघड झाले. दरम्यान, धान्याची काळ्या बाजारात विल्हेवाट लावणारा तो व्यापारी कोण? हेदेखील उघड होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

स्वस्त धान्य परवानाधारक आंबेडकर महिला बचतगटाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आहे.
-संतोष साठवणे, मुंडीकोटा.

या प्रकरणाची चौकशी झाली आहे. तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-विलास देठे, चौकशी अधिकारी, पुरवठा कार्यालय, गोंदिया

loading image
go to top