भामरागडमधील समस्यांची मालिका संपता संपेना, आता हे नवीनच!

लीलाधर कसारे
Monday, 24 August 2020

ही इंद्रावती नदी भामरागड तालुक्‍यातील कवंडे गावातून प्रवेश करून पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे गोदावरी नदीस मिळते. तत्पूर्वी भामरागड येथे इंद्रावती नदीला पर्लकोटा व पामलगौतमी या नद्या येऊन मिळतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर दाब वाढून या नदीवरचा पूल पाण्याखाली बुडाला होता. तब्बल पाच दिवसांपासून भामरागड येथे पुराचे थैमान सुरू होते. मात्र, प्रशासनाने कौशल्याने परिस्थिती हाताळत १४० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.

भामरागड : यंदा भामरागड तालुक्‍यात दुसऱ्यांदा पूर आला. तो आता ओसरत असला, तरी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पाच दिवस थैमान घातलेल्या पुराचा सामना केल्यानंतर आता भामरागडवासींना गुडघाभर साचलेल्या चिखलाचा सामना करावा लागणार आहे.

संततधार पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व सिरोंचा तालुक्‍यातील मेडीगड्डा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग तसेच जिल्ह्यात वाहणाऱ्या विविध नद्या-उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या-धरणांमधून वेळोवेळी सोडण्यात येणारे पाणी यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या, नाल्यांच्या जलपातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगड राज्यातील जगदलपूरकडून येणारी इंद्रावती नदी धोकादायक पातळीवर वाहत होती.

ही इंद्रावती नदी भामरागड तालुक्‍यातील कवंडे गावातून प्रवेश करून पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे गोदावरी नदीस मिळते. तत्पूर्वी भामरागड येथे इंद्रावती नदीला पर्लकोटा व पामलगौतमी या नद्या येऊन मिळतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर दाब वाढून या नदीवरचा पूल पाण्याखाली बुडाला होता. तब्बल पाच दिवसांपासून भामरागड येथे पुराचे थैमान सुरू होते. मात्र, प्रशासनाने कौशल्याने परिस्थिती हाताळत १४० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.

रविवारी (ता. २३) सकाळपासून पर्लकोटा नदीचे पाणी कमी व्हायला लागले व पुलाचा वरचा भाग थोडा दिसू लागला. आकाशही निरभ्र असून थोडे उन्ह असल्याने आता हा पूर पूर्ण ओसरेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. पण, केवळ पूर ओसरून नागरिकांची समस्या सुटणारी नाही.

हा पूर मागे गाळ व चिखल ठेवून गेला आहे. रस्त्यांवर, घरांमध्येही चिखलाचे थर साचले आहेत. त्यामुळे हा चिखल स्वच्छ करण्यातच नागरिकांचे दोन दिवस जाणार आहेत. शिवाय सध्या सगळा परिसर चिखलमय असल्याने सुरक्षित स्थळी असलेले नागरिकही आपल्या घरी परतू शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा काही दिवस येथील नागरिकांना अव्यवस्थेचा सामना करावा लागणार आहे.

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'
रात्री आला असता तर
मागील वर्षाच्या सतत सातवेळा आलेल्या पुरांच्या आठवणीने भामरागडवासींच्या अंगावर शहारा येतो. तेव्हा पूर रात्री आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेकजण साखरझोपेत असतानाच घरात पाणी शिरल्याचे लक्षात आले आणि त्यांना घरातील सगळे साहित्य तसेच सोडून सुरक्षित स्थळी निघावे लागले. यंदा पूर दिवसा आला आणि नागरिकांना मागील वर्षीच्या पुराचा अनुभव होता. प्रशासनही दक्ष होते. त्यामुळे नागरिकांना आपले साहित्य आवरायला वेळ मिळाला.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: series of problems in Bhamaragad