त्या नराधमांना शिक्षा द्यायला तिला हवाय रामपुरी चाकू!

patra
patra

पुसद (जि. यवतमाळ) : एकुलती एक मुलगी. नाव साक्षी. नववीत शिकणारी. आई-वडिलांची लाडकी. मुलीच्या जन्माचे स्वागत पुरोगामी बंजारा कुटुंबात थाटात झालेले . पहिल्या वाढदिवसापासूनच वडील तिला प्रत्येक वाढदिवसाला हमखास 'गिफ्ट' देत आणि तिच्या आनंदात सहभागी होत.
साक्षीचा रविवारी वाढदिवस होता. वाकदच्या शेतातून यायला पित्याला थोडा उशीर झाला. घरी आल्यावर साक्षीला त्यांनी प्रथम बर्थडे 'विश' केले."बेटा तुला कुठले गिफ्ट आणू? ", असे सहज तिला विचारले. तर साक्षीने एक बंद लिफाफा वडील मनीष जाधव यांच्या हाती सोपवला. उत्सुकतेने त्यांनी तो फोडला. साक्षीने वळणदार अक्षरात लिहिलेले पत्र भराभरा वाचले आणि क्षणभर त्यांना धक्काच बसला. तिने मागितलेले 'गिफ्ट' वाचून मनीष हबकून गेले.
निर्भया प्रकरणात चार आरोपींना नुकतीच झालेली फाशी, हैदराबाद येथील नराधमांचा एनकाऊंटर, हिंगणघाट येथील तरुणीला जिवंत जाळण्याची घटना आणि परवाच उमरखेड तालुक्‍यातील आठ वर्षीय चिमुकलीचा अत्याचारातून झालेला अमानुष खून या समाजातील भयावह घटनांचा कोवळ्या मनावर किती खोलवर परिणाम होतो, त्याचे द्योतक म्हणजे संवेदनशील साक्षीने मागितलेले 'गिफ्ट' होय !
वडिलांना लिहिलेल्या पत्रात चक्क समाजात मुलींवर घडणाऱ्या अत्याचाराबद्दल साक्षीने चिंता व्यक्त केली. प्रत्येक घटनेचा उल्लेख करत वासनांध, विकृत मनोवृत्तीचा तिने निषेध केला व आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. आता प्रत्येक मुलीने आपले रक्षण स्वतःच केले पाहिजे, असा ठाम निर्धार करत साक्षीने पत्रात लिहिले...." पप्पा मला खेळणी वा इतर काही वस्तू नकोत. मला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचे असेल तर 'रामपुरी चाकू' द्या. वाईट नजर ठेवणाऱ्या नराधमाचे मी तुकडे तुकडे करीन. वेळ आली तर स्वतःचे रक्षण मी स्वतःच करीन ".
तिच्या या अनपेक्षित मागणीने वडील मनीष जाधव काही काळ अवाक झाले. समाजातील विकृत प्रवृत्तीचा तिच्या मनावर झालेला परिणाम पाहून ते स्वतः गंभीर बनले. ही घटना साधी-सुधी नव्हे. साक्षी महागाव तालुक्‍यातील वाकद जवळच्याच काळी दौलतखान येथील पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकते. मैत्रिणींसोबत दररोज ती मानव विकास मिशनच्या एसटी बसने ये-जा करते. तिने प्रियंका अत्याचार प्रकरणात शाळेने काढलेल्या निषेध मोर्चात सहभाग घेतला होता. नराधमांना ताबडतोब फाशीवर चढविले पाहिजे, अशी ठाम भूमिकाही तिने मांडली होती.
वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून धारदार शस्त्र कुणी लेक पित्याकडे मागणार नाही. मात्र, प्रत्यक्ष बोलण्याचे धाडस न झाल्याने साक्षीने आपल्या पत्रातून समाजातील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. साक्षीने मागितलेले वाढदिवसाचे 'गिफ्ट' समाजाला नक्कीच अंतर्मुख करणारे आहे.

सविस्तर वाचा - त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग! वाचा यांची संवेदनशीलता
पत्र वाचून अस्वस्थ
मुलीचे पत्र वाचून अस्वस्थ झालो. मी स्वतः शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची माझी वृत्ती आहे. मुलीने वाढदिवसाची मागितलेले 'गिफ्ट' म्हणजे समाजात घडणाऱ्या अत्याचारी घटनांचा कोवळ्या मनावर खोलवर झालेला परिणाम यातून व्यक्त होतो.
 मनीष जाधव, वाकद ता. महागाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com