ती शेतात रोवायला गेली अन्‌ महाविद्यालयातून आला फोन, मुलीबाबत विचारणा करताच आले भरून...

संदीप रायपुरे
Saturday, 18 July 2020

मयूरी येथील लक्ष्मणराव कुुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. यंदा तिने कुटुंबाला मदतीचा हात देत अभ्यासही केला आणि बारावीची परीक्षा दिली. कोरोनाचे संकट आले. सारेच थांबले. सध्या धानाच्या रोवणीचा हंगाम आहे. ग्रामीण भागात हा हंगाम जवळपास दीड महिना चालतो. याच कामावर मयूरी जात आहे. काल बारावीचा निकाल जाहीर झाला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : ती रोवायला शेतात गेली आणि अचानक महाविद्यालयातून फोन आला. तिच्याबाबत विचारणा झाली. घरच्यांना वाटले काय झाले? पण पुढचे शब्द ऐकले आणि जीव भांड्यात पडला.

प्राचार्यांनी सांगितले तुमची मुलगी बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयातून पहिली आली. शेतमजूर आईवडिलांच्या खांद्यांला खांदा लावून शेतात राबणारी मुलगी अव्वल आल्याची बातमी ऐकून त्यांनाही भरून आले. आता तिच्या यशाची गावासह शेताच्या बांधावर चर्चा सुरू आहे.

आक्‍सापूरातील गोविंदा टेकाम अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या शेताच्या तुकड्यात भागत नाही म्हणून ते इतरांच्या शेतात मजुरी करतात. त्यांची पत्नी अरुणा व मुलगी मयूरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात काम करतात. यावरच टेकाम कुटुंबीयांचा गाडा चालतो.

मयूरी येथील लक्ष्मणराव कुुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. यंदा तिने कुटुंबाला मदतीचा हात देत अभ्यासही केला आणि बारावीची परीक्षा दिली. कोरोनाचे संकट आले. सारेच थांबले. सध्या धानाच्या रोवणीचा हंगाम आहे. ग्रामीण भागात हा हंगाम जवळपास दीड महिना चालतो. याच कामावर मयूरी जात आहे. काल बारावीचा निकाल जाहीर झाला.

मयूरी शेताच्या बांध्यावर रोवायला गेलेली. घरी काही आप्तजन होते. अचानकपणे घरचा भ्रमणध्वनी वाजला. तो मयुरीच्या महाविद्यालयातून आलेला होता. भ्रमणध्वनीवरून प्राचार्य प्रदीप ब्राह्मणकर यांनी मयुरीबाबत विचारणा केली. घरच्यांना वाटले काय झाले. पण नंतर मयूरी बारावीच्या परीक्षेत कुंदोजवार महाविद्यालयातून प्रथम आल्याची माहिती त्यांनी दिली. कला शाखेतून तिने 78 टक्के गुण प्राप्त केल्याचे सांगितले. अन सारेच अवाक राहिले.

आईवडीलांसोबत शेतमजुर म्हणून काम करणाऱ्या मयुरीने अभ्यासातही बाजी मारली. तिच्या यशाचे गावकरीही कौतुक करीत आहेत. एका आदिवासी कुटुंबातील मयुरीच्या यशाची चर्चा आज दिवसभर आक्‍सापूरातील शेताच्या बांधावर रंगली होती. रोवणी करताना तिचे अभिनंदन अन कौतुकही अनेकांनी केले. तिला अजून खूप शिकायचे आहे. तिचा लहान भाऊ नववीत शिकतो. त्यालाही घडवायचे तिच्या मनात आहे.

सविस्तर वाचा - Video : महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर संतापल्या; भाजप म्हणजे सत्तेसाठी वळवळणारा शेणातला कीडा

प्रेरणादायी यश
एका शेतमजूर कुटुंबातील मयुरीने कुटुंबाला मदतीचा हात देत मिळविलेले यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. ग्रामीण भागात गुणवत्तेची कमतरता नाही हे तिने दाखवून दिले.
प्रदीप बामणकर,
प्राचार्य, स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She got excellent marks in 12th exam.