महाविकास आघाडीसाठी सकारात्मक पाऊल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

तिन्ही पक्षांचे जागांवर अडले घोडे
मंगळवारी नागपुरात होणार पुन्हा चर्चा

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीन निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आघाडी करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. मात्र सर्कलनिहाय जागांचा तोडगा काढताना शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळे आघाडीचे घोडे अडले आहे. आता आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीनंतर तिन्ही पक्ष मंगळवारी नागपुरात पुन्हा महाविकास आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. दरम्‍यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिक स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले आहेत.

अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेसह राज्यातील पाच जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेवून स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मित्र पक्षांशी आघाडी करण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अनुकूल आहेत. शुक्रवारी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत विचारणा केली. त्यावर काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबत आघाडीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रविवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यच्या उपस्थितीत तिन्ही पक्षांची बैठक झाली.

 

तीन तास चाललेल्या या बैठकीत तिन्ही पक्षांनी राज्याप्रमाणे जिल्ह्यातह महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. जिल्हा परिषदेचे गट व तेथे कोणत्या पक्षचे किती बळ आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक राहिली असली तरी शिवसेनेला आघाडीत सर्वाधिक वाट हवा असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दोन्ही पक्षांसाठी प्रत्येकी २० ते २२ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुले आज बैठकीत जागा वाटपाचा तिढा कायम राहिले. आता याबाबत नागपूर येथे १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

शिवसेनेला हव्यात सर्वाधिक जागा
महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेने तयारी दर्शविली आहे. मात्र अकोला, पातूर आणि बाळापूर येथील सर्व सर्कल व उर्वरित चार तालुक्यात तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाबाबत शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील तिन्ही पक्षांचे एकूण बळ बघता शिवसेनेने ४० ते ४२ जागांवर दावा केला असल्याने महाविकास आघाडीत ५३ सर्कलचे वाटप कोणत्या न्यायाने करणार यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली असल्याचे दिसून येते. काँग्रेस आघाडीनेही ४० ते ४२ जागांवर दावा केल्याची माहिती आहे.

 

आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी

‘वंचित’चे आव्हान आमच्या पुढे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आता नागूपर येथे १७ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत पुढील चर्चा करण्यात येईल.
आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख

 

सर्वांना विश्‍वासात घेवून तोडगा
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहू शकते, याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांना विश्‍वासात घेवून तोडगा काढण्यात येईल. वरिष्ठांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 

प्राथमिक चर्चा
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीत तिन्ही पक्षांकडून आघाडीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आता पुढील बैठक मंगळवारी नागपूरला होणार असून, या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल.
संग्रामभैय्या गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SHIV SENA AND CONGRESS ALLIANCE POSITIVE MODE