Vidhan Sabha 2019 युतीच्या उमेदवारास शिवसेनेकडून असहकार

File photo
File photo

भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्रात युती, आघाडीच्या उमेदवारांविरोधात मित्र पक्षांच्या उमेदवारांनीच बंडखोरी केली आहे. यामुळे सध्या युती, आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा रिपाइं (आ.) गटाच्या उमेदवारास असलेला असहकार तर, आघाडी उमेदवाराच्या प्रचारापासून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली फारकत डोकेदुखी ठरत आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्र युतीच्या कोट्यात मित्रपक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) तर आघाडीच्या कोट्यात रिपा (कवाडे) गटाला गेला. रिपाइं (आठवले) गटाकडून रिंगणात असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. यामुळे त्यांच्या विजयासाठी भाजपची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंडखोरी करीत माजी आमदार नरेद्र भोंडेकर हे अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. तर, आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला असलेला मतदारसंघ ऐनवेळी रिपाइं (कवाडे) गटाला दिल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. कवाडे गटातून रिंगणात असलेले जयदीप कवाडे कॉंग्रेसच्या चिन्हावर असले तरी कॉंग्रेसकडून त्यांना पाहिजे तितके समर्थन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूरच ठेवले असल्याने सध्यातरी "एकला चलो रे' अशी वेळ रिपाइं (कवाडे) गटावर आली आहे. युती व आघाडीत पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी मिळत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण झाली आहे. मोजके दिवस असल्याने प्रचाराला वेग आला असून यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस कार्यकर्ते साकोलीत, तर राष्ट्रवादीचे तुमसरात
भंडारा विधानसभा क्षेत्र आघाडीत रिपाइं (कवाडे) गटाला गेल्याने नाराज कॉंग्रेस कार्यकर्ते साकोली मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचाराला गेले. तर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमसर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात एकप्रकारे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिपाइं (कवाडे) गटाच्या उमेदवारावर बहिष्कार तर टाकला नाही ना?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून असलेली ही परिस्थिती आजही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com